IND vs AUS 1st T20 Match Live Updates | विशाखापट्टनम : पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच ट्वेंटी-२० सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवची ऑस्ट्रेलियाने डोकेदुखी वाढवली. 'सूर्या' भारताच्या युवा ब्रिगेडचे नेतृत्व करत आहे. आजपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ट्वेंटी-२० मालिकेला सुरूवात झाली आहे. विशाखापट्टनम येथे होत असलेल्या या सलामीच्या सामन्यासाठी भारतीय संघात नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने यजमानांची धुलाई केली. जोश इंग्लिसने अप्रतिम शतक झळकावून भारतासमोर धावांचा डोंगर उभारला.
सुरूवातीपासूनच स्टीव्ह स्मिथ आणि मॅथ्यू शॉर्ट यांनी ऑस्ट्रेलियाचा आक्रमक खेळण्याचा इरादा स्पष्ट केला. पण स्मिथला शांत ठेवण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले, मात्र जोश इंग्लिसचे वादळ भारताच्या युवा ब्रिगेडला धुवून गेले. इंग्लिसने केवळ ५० चेंडूत ८ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने ११० धावांची स्फोटक खेळी केली. तर स्टीव्ह स्मिथने (५२) धावा करून ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत पोहचवले. घातक वाटणाऱ्या इंग्लिसला बाद करण्यात प्रसिद्ध कृष्णाला अखेर यश आले. पण इंग्लिसने शतक झळकावून आपले काम केले होते. भारताकडून प्रसिद्ध कृष्णा आणि रवी बिश्नोई यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.
भारतासमोर तगडे लक्ष्य अखेरच्या काही षटकांमध्ये टिम डेव्हिडने स्फोटक खेळी करताना १३ चेंडूत १९ धावा केल्या. अखेरचे षटक मुकेश कुमारने अप्रतिम टाकून कांगारूंना २०८ धावांवर रोखले. लक्षणीय बाब म्हणजे अखेरच्या षटकात एक नो बॉल गेला असताना देखील मुकेशने केवळ ५ धावा देण्याची किमया साधली. भारताला विजयी सलामी देण्यासाठी १२० चेंडूत २०९ धावांची आवश्यकता आहे.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, इशान किशन, तिलक वर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार आणि प्रसिद्ध कृष्णा.
आजच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ - मॅथ्यू वेड (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस, अॅरॉन हार्डी, मार्कस स्टॉयनिस, टिम डेव्हिड, शॉन ॲबॉट, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, तन्वीर संघा.