Join us  

IND vs AUS : अखेरच्या षटकात मोठा ट्विस्ट! ३ चेंडूत ३ विकेट; 'सूर्या' चमकला! टीम इंडियाचा 'इ'शानदार विजय

IND vs AUS live Match : आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ट्वेंटी-२० मालिकेतील पहिला सामना खेळवला गेला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 10:48 PM

Open in App

IND vs AUS 1st T20 Match Live Updates | विशाखापट्टनम : ऑस्ट्रेलियाला नमवून भारतीय संघाने पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतील पहिला सामना जिंकून विजयी सलामी दिली. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने अप्रतिम खेळी करून कागांरूना पराभवाची धूळ चारली. नाणेफेक जिंकून भारताने पाहुण्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले होते. स्टीव्ह स्मिथ आणि मॅथ्यू शॉर्ट यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरूवात केली. पण, शॉर्टला स्वस्तात बाद करण्यात भारताला यश आले. परंत, जोश इंग्लिसने स्फोटक खेळी करत ५० चेंडूत शतक झळकावले. ऑस्ट्रेलियाने निर्धारित २० षटकांत ३ बाद २०८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात २०९ धावांचा पाठलाग करताना भारताने २ गडी राखून विजय साकारला.

भारतीय सलामीवीर ऋतुराज गायकवाड (०) आणि यशस्वी जैस्वाल (२१) बाद झाल्यानंतर भारतीय कर्णधार 'सूर्या'चे आगमन झाले. त्याला इशान किशनने चांगली साथ दिली आणि ताबडतोब अर्धशतक झळकावले. किशनने ५ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ५८ धावांची खेळी केली. सूर्यकुमारने १९०.४८च्या स्ट्राईक रेटने धावा करून भारताची विजयाकडे कूच केली. पण जेसन बेहरेनडॉर्फच्या गोलंदाजीवर अॅरॉन हार्डीने शानदार झेल घेऊन भारतीय कर्णधाराच्या खेळीचा अंत केला. सूर्याने ४२ चेंडूत ८० धावा केल्या, ज्यामध्ये ४ षटकार आणि ९ चौकारांचा समावेश राहिला. 

अखेरच्या षटकांत मोठा ट्विस्टभारताला विजयासाठी अखेरच्या षटकात सात धावांची आवश्यकता होती. रिंकू सिंगने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकून विजयाकडे भारताची गाडी नेली. पण दुसऱ्या चेंडूवर एक धाव काढून त्याने अक्षर पटेलला फलंदाजीची संधी दिली. परंतु, मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात अक्षर बाद झाला. चौथ्या चेंडूवर रवी बिश्नोई बाद झाला तर त्याच्या पुढच्या चेंडूवर अर्शदीप सिंग धावबाद झाला. अखेरच्या चेंडूवर भारताला विजयासाठी एक धाव हवी होती. लक्षणीय बाब म्हणजे अखेरच्या चेंडूवर षटकार खेचून रिंकू सिंगने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. शेवटचा चेंडू नो बॉल असल्याने भारताने २ गडी आणि १ चेंडू राखून विजय साकारला. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, इशान किशन, तिलक वर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार आणि प्रसिद्ध कृष्णा. 

आजच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ -मॅथ्यू वेड (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस, अॅरॉन हार्डी, मार्कस स्टॉयनिस, टिम डेव्हिड, शॉन ॲबॉट, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, तन्वीर संघा.

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियासूर्यकुमार अशोक यादवभारतीय क्रिकेट संघरिंकू सिंगइशान किशन