IND vs AUS 1st T20 Match Live Updates | विशाखापट्टनम : रिंकू सिंगने आयपीएल २०२३ च्या हंगामात एक फिनिशर म्हणून प्रसिद्धी मिळवली अन् अवघ्या जगाला भारताचा स्टार समजला. कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना त्याने एकाच षटकात पाच षटकार ठोकून गुजरात टायटन्सच्या तोंडचा घास पळवला होता. आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला ट्वेंटी-२० सामना खेळवला गेला. अखेरच्या षटकात काही नाट्यमय घडामोडी घडल्या. भारताने एकाच षटकात तीन गडी गमावले अन् मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. दबावात आलेल्या टीम इंडियाला अखेरच्या चेंडूवर विजयासाठी १ धाव हवी होती. पण, रिंकूने षटकार खेचून भारताला विजय मिळवून दिला. शेवटचा चेंडू नो बॉल असल्याने भारताने २ गडी आणि १ चेंडू राखून विजय साकारला.
तत्पुर्वी, नाणेफेक जिंकून भारताने पाहुण्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले होते. स्टीव्ह स्मिथ आणि मॅथ्यू शॉर्ट यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरूवात केली. पण, शॉर्टला स्वस्तात बाद करण्यात भारताला यश आले. परंत, जोश इंग्लिसने स्फोटक खेळी करत ५० चेंडूत शतक झळकावले. ऑस्ट्रेलियाने निर्धारित २० षटकांत ३ बाद २०८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात २०९ धावांचा पाठलाग करताना भारताने २ गडी राखून विजय साकारला.
भारतीय सलामीवीर ऋतुराज गायकवाड (०) आणि यशस्वी जैस्वाल (२१) बाद झाल्यानंतर भारतीय कर्णधार 'सूर्या'चे आगमन झाले. त्याला इशान किशनने चांगली साथ दिली आणि ताबडतोब अर्धशतक झळकावले. किशनने ५ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ५८ धावांची खेळी केली. सूर्यकुमारने १९०.४८च्या स्ट्राईक रेटने धावा करून भारताची विजयाकडे कूच केली. पण जेसन बेहरेनडॉर्फच्या गोलंदाजीवर अॅरॉन हार्डीने शानदार झेल घेऊन भारतीय कर्णधाराच्या खेळीचा अंत केला. सूर्याने ४२ चेंडूत ८० धावा केल्या, ज्यामध्ये ४ षटकार आणि ९ चौकारांचा समावेश राहिला.
रिंकूचा षटकार अन् भारताची विजयी सलामी
भारताला विजयासाठी अखेरच्या षटकात सात धावांची आवश्यकता होती. रिंकू सिंगने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकून विजयाकडे भारताची गाडी नेली. पण दुसऱ्या चेंडूवर एक धाव काढून त्याने अक्षर पटेलला फलंदाजीची संधी दिली. परंतु, मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात अक्षर बाद झाला. चौथ्या चेंडूवर रवी बिश्नोई बाद झाला तर त्याच्या पुढच्या चेंडूवर अर्शदीप सिंग धावबाद झाला. अखेरच्या चेंडूवर भारताला विजयासाठी एक धाव हवी होती. लक्षणीय बाब म्हणजे अखेरच्या चेंडूवर षटकार खेचून रिंकू सिंगने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.