IND vs AUS 1st Test Perth Pitch report: भारतीय संघ प्रतिष्ठेची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) खेळायला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आला आहे. २२ नोव्हेंबर ते ७ जानेवारी असा तब्बल प्रदीर्घ काळ हा दौरा सुरु असणार आहे. भारतीय संघाची नुकतीच न्यूझीलंड विरूद्धची मालिका संपली असून त्यात भारतावर ३-०ने पराभवाची नामुष्की ओढवली. आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. भारतीय संघ कोणताही सराव सामना न खेळता २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पर्थ कसोटीत उतरणार आहे. १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान भारतीय संघ स्वत:चेच २ संघ बनवून एक सराव सामना खेळणार होता, पण तो सामना रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय संघ वाका स्टेडियमवर तयारी करणार आहे, जिथे ऑस्ट्रेलियन संघाचे खेळाडूही सराव करताना दिसणार आहेत. अशा परिस्थितीत पहिल्या कसोटीसाठी खेळपट्टी कशी असेल, याबाबतची अपडेट समोर आली आहे.
ऑस्ट्रेलियात भारताला अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. तिथल्या खेळपट्टीवर टीम इंडियाला वेगवान आणि उसळीपूर्ण पिचवर सामने खेळावे लागणार आहेत. दोन्ही संघांमधील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीचे आयोजन करणारी ऑप्टस स्टेडियमची खेळपट्टी पर्थच्या खेळपट्टीप्रमाणे 'चांगली उसळी घेणारी आणि वेगवान असेल असे संकेत देण्यात आले आहेत.
वेस्टर्न ऑस्ट्रेलिया क्रिकेटचे मुख्य क्युरेटर आयझॅक मॅकडोनाल्ड यांनी ईएसपीएनक्रिकइन्फोला सांगितले की ऑस्ट्रेलियातील पर्थची खेळपट्टी खूप चांगल्या गतीने आणि खूप चांगल्या बाऊन्सआसाठी तयार करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचे तीन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्क यांना या खेळपट्टीवर नक्कीच गोलंदाजी करायला आवडेल. मॅकडोनाल्ड म्हणाले की खेळपट्टीवर थोडेफार गवत ठेवण्याचा विचार आहे. गेल्या वर्षीची परिस्थिती लक्षात घेता यंदा खेळपट्टीवर १० मिमी गवत असले तरी खेळ वेगवान होईल. गेल्या वर्षी दोन्ही मालिकांमध्ये खेळपट्टी वेगवाग होती, तशाच प्रकारची खेळपट्टी आताही अपेक्षित आहे.
दरम्यान, या मालिकेतून ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू कॅमेरॉन ग्रीन याने माघार घेतली आहे. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीनच्या मणक्याच्या हाडावर भार येत असल्याने फ्रॅक्चर झाले आहे. या आठवड्यात त्याच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शस्त्रक्रियेची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सोमवारी दिली. पाठदुखीमुळे तो इंग्लंड दौऱ्यावरून लवकर मायदेशी परतला होता. यानंतर, काही चाचण्या आणि स्कॅन करण्यात आले, ज्यावरून असे दिसून आले की त्याला लवकरात लवकर ही शस्त्रक्रिया आवश्यक आहे. वेगवान गोलंदाजांसाठी मणक्यामध्ये तणाव आणि फ्रॅक्चर येणे ही बाब धोक्याची असते. त्यामुळे दुखापतीचा धोका कमी करण्यासाठी त्याला लवकर शस्त्रक्रिया करुन घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Web Title: IND vs AUS 1st Test at Perth Pitch report fast and bouncy pitch helpful to fast bowlers
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.