Join us  

IND vs AUS 1st Test : मी जाऊन त्याच्या कानाखाली खेचेन! कपिल देव अचानक टीम इंडियाच्या खेळाडूवर संतापले

IND vs AUS 1st Test : भारताचे माजी कर्णधार कपिल देव ( Kapil Dev) हे अचानक भारतीय खेळाडूवर संतापलेले पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2023 11:43 AM

Open in App

IND vs AUS 1st Test : भारताचे माजी कर्णधार कपिल देव ( Kapil Dev) हे अचानक भारतीय खेळाडूवर संतापलेले पाहायला मिळाले. त्यांनी अचानक आपल्या एका वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे. टीम इंडियाच्या एका खेळाडूवर १९८३च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे कर्णधार अचानक भडकले आहे. त्यांनी तर, मी जाऊन त्याला जोरदार चपराक मारीन असे म्हटले. कपिल देव यांच्या या वक्तव्यामुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. 

१९८३च्या वर्ल्ड कप विजेता कर्णधार कपिल देव यांनी टीम इंडियाचा यष्टिरक्षक रिषभ पंत यांच्याबद्दल मोठे विधान केले आहे. पंतवर प्रतिक्रिया देताना कपिल देव म्हणाला, ''रिषभ पंत लवकर बरा व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि जेव्हा तो बरा होईल तेव्हा मी जाऊन त्याला जोरात कानाखाली मारेन. तुमच्या दुखापतीने संपूर्ण संघाचे संपूर्ण नियोजन खराब केले आहे. मग असा संतापही येतो की आजकालची तरुण मुलं अशा चुका का करतात? म्हणूनच त्याच्यासाठी त्याला मी मारणार आहे.''

कपिल देव म्हणाले, 'रिषभ पंतला आशीर्वाद आणि प्रेम. देव त्याला लवकर बरा करो. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना उद्यापासून नागपुरात खेळवला जाणार आहे. पंतची अनुपस्थिती ही टीम इंडियासाठी मोठी हानी आहे, कारण पंत हा कसोटी फॉरमॅटमध्ये एक जबरदस्त यष्टीरक्षक असण्यासोबतच एक अतिशय धोकादायक फलंदाज आहे. पंत कसोटी फॉरमॅटमध्ये जलद धावा करतो आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या महत्त्वाच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाला त्याची उणीव भासेल.'' 

रिषभ पंतचा ३० डिसेंबर २०२२ मध्ये कार अपघात झाला होता. तो नवी दिल्लीहून त्याच्या मूळ गावी रुरकीला जात होता आणि त्याची मर्सिडीज कार चालवत होता. डेहराडून हायवेवर पंतची कार डिव्हायडरला धडकली आणि आग लागली. २५ वर्षीय पंतच्या कपाळावर गंभीर दुखापत झाली आहे, गुडघ्याचा लिगामेंट फाटला आहे, तसेच उजव्या हाताच्या मनगटावर, घोट्याला आणि पायाच्या बोटाला दुखापत झाली आहे. पंत आता हळूहळू दुखापतीतून सावरत आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकपिल देवरिषभ पंत
Open in App