Join us  

IND vs AUS 1st Test: नागपूर कसोटी सुरू असतानाच भडकला Ricky Ponting, म्हणाला- "या फलंदाजाला पहिले संघातून बाहेर काढा..."

पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाचा डाव १७७ धावांत आटोपला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 4:25 PM

Open in App

Ricky Ponting, IND vs AUS 1st Test: नागपूर कसोटीतील पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ अवघ्या १७७ धावांवर बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन दिग्गज खेळाडूंना ही कामगिरी फारशी रूचली नाही. अवघी एक खेळी पाहिल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या काही माजी क्रिकेटपटूंनी खेळाडूंवर जोरदार टीका केली आणि क्रिकेट संघात मोठ्या बदलांची गरज असल्याचे सांगितले. माजी कर्णधार रिकी पाँटिंगने तर थेट डेव्हिड वॉर्नरला वगळण्याबाबत विधान केले आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने आपल्या देशाच्या निवडकर्त्यांना सूचित केले आहे की डेव्हिड वॉर्नर सतत अपयशी ठरल्यास त्याच्या प्लेइंग इलेव्हनमधील स्थानावर पुनर्विचार केला जाऊ शकतो.

भारताविरुद्धच्या नागपूर कसोटीच्या पहिल्या डावात वॉर्नर केवळ एक धावा काढून बाद झाला. मोहम्मद शमीच्या जबरदस्त इनस्विंगवर त्याचा ऑफ स्टंप उडाला. भारतातील त्‍याची कसोटी कामगिरी खूपच खराब आहे. भारतात तो केवळ २२.८८ च्या सरासरीने धावा करू शकला आहे. यामुळेच पॉन्टिंगने वॉर्नरला बाहेर काढण्याबद्दल विधान केले आहे. आयसीसीच्या रिव्ह्यूमध्ये पॉन्टिंग म्हणाला, "मला वाटते की आठ कसोटींमध्ये त्याची भारतातील सरासरी २४च्या आसपास आहे. अशा परिस्थितीत तो पुन्हा एकदा तो अपयशी ठरला. तो अशा खेळाडूंपैकी एक आहे जो म्हणतोय की भारतात जिंकणे हे अँशेस मालिकेपेक्षा मोठे आहे. जर निवडकर्ता, प्रशिक्षक आणि कर्णधार यांना भारतात ही मालिका जिंकायची असेल, तर त्यांना सर्वोत्तम संघ मैदानात उतरवावा लागेल. काही फलंदाज धावा काढत नसतील तर त्यांच्या जागी धावा करणारे प्रतिभावान खेळाडू संघात घेणे गरजेचे आहे."

"अँशेस 2021-22 मालिकेतील खेळाडू ट्रेव्हिस हेडला बाहेर ठेवले जाऊ शकते तर डेव्हिड वॉर्नरला संघातून का वगळले जात नाहीये. भारतीय उपखंडातील वॉर्नरच्या कामगिरीमुळे आता त्याला डोकं वर काढणं अवघडच होऊन बसले आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियन संघात डावखुऱ्या फलंदाजांची संख्या थोडी जास्तच झाली आहे. हीच गोष्ट डेव्हिड वॉर्नरलाही लागू होते," असे पॉन्टींग म्हणाला.

ऑस्ट्रेलियाच्या 'प्लेइंग इलेव्हन'वर प्रश्न

ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ऑस्ट्रेलियाने फॉर्मात असलेल्या ट्रेव्हिस हेडला वगळले. याशिवाय डावखुरा फिरकीपटू एश्टन एगरलाही संधी मिळाली नाही. त्याच वेळी मॅट रेनशॉला संघात स्थान देण्यावरही त्याने प्रश्न उपस्थित केले. आता पुढच्या कसोटीत ऑस्ट्रेलियन संघ काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाडेव्हिड वॉर्नरआॅस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघ
Open in App