भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : कॅचेस विन्स द मॅचेस, अशी एक म्हण आहे. पण ही म्हण कदाचित भारताचा क्रिकेटपटू लोकेश राहुलला माहिती नसावी. कारण पहिल्या सामन्यात एक सोपा झेल राहुलले सोडल्याचे पाहायला मिळाले.
ऑस्ट्रेलियाचे तीन फलंदाज माघारी परतले होते. चौथा फलंदाज लवकर कसा बाद करता येईल, याची तयारी भारतीय गोलंदाज करत होते. पण राहुलने यावर पाणी फिरवले. आर. अश्विनच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज अडखळत खेळत होते. दुसऱ्या डावाच्या 34व्या षटकात ही गोष्ट घडली. अश्विनच्या गोलंदाजीवर पीटर हँड्सकॉम्ब चकीत झाला. त्यावेळी त्याच्या बॅटची कडा चेंडूने घेतली. हा चेंडू स्टम्पजवळ उभ्या असलेल्या राहुलच्या हातात विसावत होता. पण त्यावेळी राहुलला आपले हात बंद करता आले नाहीत आणि हा झेल निसटला. त्यावेळी हँड्सकॉम्ब 13 धावांवर होता. पण या जीवदानाचा फायदा हँड्सकॉम्बला उचलता आला नाही. या धावसंख्येमध्ये फक्त एका धावाची भर घालून हँड्सकॉम्ब मोहम्मद शमीचा शिकार ठरला.