suresh raina । नागपूर : सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. गुरूवारपासून या मालिकेतील पहिला सामना नागपुरात खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची भारतीय गोलंदाजांनी कंबर मोडली. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 5 बळी घेतले. तर रविचंद्रन अश्विनला 3 बळी घेण्यात यश आले.
भारतीय संघात मोठ्या कालावाधीनंतर पुनरागमन केलेल्या जडेजाने कांगारूच्या संघाला मोठे धक्के दिले. रवींद्र जडेजाने पहिल्या सामन्याच्या पहिल्याच डावात 22 षटकांत 47 धावा देऊन 5 बळी घेत भारतीय चाहत्यांची मने जिंकली आहेत. ज्यानंतर 'सर जडेजा' सोशल मीडियावर हिरो झाला आहे. पाहुण्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने आपल्या पहिल्या डावात 63.5 षटकांत 177 धावा केल्या. भारताकडून जडेजाने (5), अश्विनने (3) तर मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतले. भारताने आपल्या डावाची शानदार सुरूवात केली. भारत पहिल्या दिवसाअखेर देखील मजबूत स्थितीत होता. पहिल्या दिवसाअखेर 24 षटकांत यजमान भारताने 1 बाद 77 धावा केल्या होत्या. कर्णधार रोहित शर्मा (56) आणि रविचंद्रन अश्विन (०) नाबाद खेळपट्टीवर टिकून होते. तर लोकेश राहुल (20) धावा करून तंबूत परतला. त्याला टॉड मुर्फीने बाहेरचा रस्ता दाखवला. दुसऱ्या दिवशी रोहितने शानदार खेळी करून शतक झळकावले.
रोहितचे शानदार शतक
भारतीय संघाकडून रोहित शर्मा (120), लोकेश राहुल (20), रविचंद्रन अश्विन (23), चेतेश्वर पुजारा (7), विराट कोहली (12), आणि सूर्यकुमार यादवने (8) धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माच्या शतकी खेळीमुळे भारत दुसऱ्या दिवसाअखेर मजबूत स्थितीत आहे. रोहित बाद होताच रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी डाव सावरला. जडेजा 170 चेंडूत 66 धावा करून तर अक्षर 102 चेंडूत 52 धावा करून खेळपट्टीवर टिकून आहे. दुसऱ्या दिवसाअखेर भारताची धावसंख्या 114 षटकांत 7 बाद 321 एवढी झाली आहे. तसेच भारताने 321 धावा करून 144 धावांची आघाडी घेतली आहे.
सुरेश रैनाकडून कौतुकाचा वर्षाव
रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी केलेल्या शानदार खेळीने ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी वाढली आहे. अशातच भारताचा माजी खेळाडू सुरेश रैनाने आपल्या खास शैलीत या जोडीचे कौतुक केले आहे. "आमचा गुजराती मुलगा 'मॅन ऑफ दी मॅच' होण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. अभिनंदन @imjadeja आणि @akshar2026 अभूतपूर्व पुनरागमन तुम्हाला अशा पद्धतीने खेळताना पाहून छान वाटते", अशा आशयाचे ट्विट करून रैनाने या जोडीचे कौतुक केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Ind vs Aus 1st test Our Gujarati boy just a step away from being 'Man of the Match' Suresh Raina praises Ravindra Jadeja and Akshar Patel
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.