R Ashwin David Warner, IND vs AUS: भारतीय संघ तिसऱ्याच दिवशी नागपूर कसोटी जिंकेल अशी परिस्थिती ऑस्ट्रेलियावर ओढवल्याचे चित्र आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १७७ धावांवर गुंडाळल्यानंतर भारताने पहिल्या डावात ४०० पर्यंत मजल मारली. गोलंदाजांसाठी आणि त्यातही फिरकीसाठी पोषक असलेल्या खेळपट्टीवर भारताला तब्ब्ल २२३ धावांची आघाडी घेता आली. त्यानंतर दुसऱ्या डावात तरी ऑस्ट्रेलियन फलंदाज पहिल्या डावातून धडा घेऊन खेळतील अशी आशा क्रिकेट चाहत्यांना होती. पण ती आशा फोल ठरली. उलट ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दुसऱ्या डावात पहिल्या डावापेक्षा वाईट कामगिरी केली. सर्वाधिक चर्चा रंगली ती डावखुरा डेव्हिड वॉर्नर याच्या विकेटची. कारण त्याला मोठी धावसंख्या करता आली नाही आणि ज्याची भीती होती तेच घडले.
पहिल्या डावात डेव्हिड वॉर्नरला काही कळण्याआधीच मोहम्मद शमीच्या स्विंग गोलंदाजीने दांडी गुल करून तंबूत धाडले होते. दौऱ्यातील पहिल्या सामन्याचा पहिलाच डाव असल्याने वॉर्नरच्या अवस्थेनंतर त्याच्यावर फारशी टीका झाली नाही. ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू काहीसे भडकल्याचे दिसून आले. पण दुसऱ्या डावात तो चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती, तसं होऊ शकलं नाही. वॉर्नरने तब्बल ४१ चेंडूचा सामना केला. त्यात त्याने दोन चौकार लगावले पण त्याने एकूण केवळ १० धावा केल्या. महत्त्वाची बाब म्हणजे, वॉर्नरला अश्विनने आपली शिकार बनवले. अश्विनच्या फिरकीच्या जाळ्यातून एकदा वॉर्नर वाचला. विराट कोहलीने स्लिपमध्ये त्याचा झेल सोडला. मग मात्र अश्विनने वॉर्नरला थेट पायचीत केले आणि नवा पराक्रम रचला.
काय आहे अश्विनचा वॉर्नरविरूद्धचा पराक्रम
आज दुसऱ्या डावात अश्विनने डेव्हिड वॉर्नरला पायचीत बाद केले. यासह डेव्हिड वॉर्नर हा अश्विनचा तब्बल ११ वेळा शिकार झाला. एकाच फलंदाजाला कसोटी क्रिकेटमध्ये बाद करण्याच्या बाबतीत अश्विनने हा पराक्रम केला. त्याने बेन स्टोक्सला देखील तब्बल ११ वेळा कसोटीत आपली शिकार केले आहे. त्याच पराक्रमाची आज वॉर्नरच्या विकेटनंतर बरोबरी झाली.
अश्विनने कसोटीत एकाच फलंदाजाला बाद करण्याची वेळ
- डेव्हिड वॉर्नर- ११ वेळा*
- बेन स्टोक्स- ११ वेळा
- अलिस्टर कूक- ९ वेळा
- टॉम लॅथम- ८ वेळा
दरम्यान, भारतीय संघाने नागपूर कसोटीत वर्चस्व गाजवले. भारताने खेळपट्टी त्यांच्यासाठी पोषक बनवल्याचा आरोप ऑस्ट्रेलियाकडून झाला. फिरकीपटूंना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर भारताने धावांचा डोंगर उभारून या आरोपांचा पार चुराडा केला. रवींद्र जडेजा, आर अश्विन यांच्या फिरकीसमोर ऑसी फलंदाज पार बेजार झाले. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १७७ धावांवर गुंडाळल्यानंतर भारताने ४०० धावा करून २२३ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी सुरूच राहिली आणि भारताने अडीच दिवसांत कसोटी जिंकली. भारताने १ डाव व १३२ धावांनी विजय मिळवताना मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.