Rohit Sharma Irfan Pathan, IND vs AUS Video: ऑस्ट्रेलियन संघाला पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी रडवले. भारतीय संघाने पाहुण्या संघाला पहिल्या कसोटीत १३२ धावा आणि एका डावाने धूळ चारली. भारताचे फिरकी त्रिकूट रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा आणि अक्षर पटेल यांनी दमदार कामगिरी करून दाखवली. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला १७७ धावा करता आल्या. त्यानंतर भारताने कर्णधार रोहित शर्माच्या शतकाच्या बळावर ४०० धावा केल्या. दुसऱ्या डावात भारताने सुरूवातीपासूनच फिरकीपटूंच्या जोरावर ऑस्ट्रेलियाची पिसं काढली. त्यानंतर रोहित शर्माने सामन्यानंतर तुफान धम्माल विनोदी किस्सा सांगितला. त्यामुळे कमेंटेटर इरफान पठाण नि बाकीचेही लोक हसू लागले.
नक्की काय घडला किस्सा?
रोहित शर्माने एक भन्नाट अनुभव सांगितला. तो म्हणाला, "सगळे जण माझ्या आजूबाजूला असतात. सगळ्यांना काही ना काही विक्रम करायचे असतात. आणि त्यांना त्यांचे विक्रम माहिती असतात. या लोकांचे रोजच काही तरी विक्रम होतच असतात. कुणी ५ विकेट्स घेतात. कुणी २० वेळा ५ विकेट्स घेतात. कुणी २५० विकेट्स घेतंय. कुणी ४५० विकेट्स घेतंय. रोज कुणीतरी काही तरी पराक्रम करत असतो. मला माहितीही नसेत, हेच लोकं माझ्या जवळ येतात नि मला सांगतात मी २५० विकेट्सच्या जवळ आहे, मला बॉलिंग करायची आहे. कोणी तरी सांगतं की मी ४५० विकेट्सच्या जवळ आहे, मला बॉल दे."
"फक्त कसोटी नाही, वन डेमध्ये पण एक जण येतो नि म्हणतो, ४ विकेट्स झाल्यात मला ५ वी विकेट घ्यायची आहे. वन डे सामन्यात २५ ओव्हर्समध्ये सिराजने १० ओव्हर्स टाकल्या, कारण त्याला पाच विकेट्स हव्या होत्या. मी त्याला सांगत होतो की भाई, थांब जरा.... आपल्याला चार टेस्ट मॅच खेळायच्यात... पण तो थांबतच नव्हता..." हा किस्सा ऐकल्यावर तर इरफान पठाण आणि कॉमेंट्री पॅनेलमधले बाकीचे लोकांना अक्षरश: हसू अनावर झालं.
दरम्यान, भारतीय संघाने नागपूर कसोटीत वर्चस्व गाजवले. भारताने खेळपट्टी त्यांच्यासाठी पोषक बनवल्याचा आरोप ऑस्ट्रेलियाकडून झाला. फिरकीपटूंना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर भारताने धावांचा डोंगर उभारून या आरोपांचा पार चुराडा केला. रवींद्र जडेजा, आर अश्विन यांच्या फिरकीसमोर ऑसी फलंदाज पार बेजार झाले. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १७७ धावांवर गुंडाळल्यानंतर भारताने ४०० धावा करून २२३ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी सुरूच राहिली आणि भारताने अडीच दिवसांत कसोटी जिंकली. भारताने १ डाव व १३२ धावांनी विजय मिळवताना मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
Web Title: Ind vs Aus 1st Test Rohit Sharma shares funny incidence about Team India bowlers their milestones Siraj Irfan Pathan can not control his laughter watch
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.