Team India Playing XI, IND vs AUS 1st Test: भारतीय कसोटी संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे, तिथे त्यांना बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथे होणार आहे. मात्र हा सामना भारतीय संघासाठी सोपा असणार नाही. कारण भारतीय संघ पर्थ कसोटीत कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीशिवाय मैदानात उतरणार आहे. अशा स्थितीत पर्थ नितीश कुमार रेड्डी ( Nitish Kumar Reddy ) या नवख्या अष्टपैलू खेळाडूचे कसोटी पदार्पण जवळपास निश्चित मानले जात आहे.
नितीश कुमार रेड्डीला संधी?
ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्या या फिरकीपटूंपेक्षा वेगवान आण मध्यमगती गोलंदाजांना अधिक पोषक असतात. त्यामुळे भारताकडून अष्टपैलू खेळाडूंमध्येही एखादा वेगवान गोलंदाज घेण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. अशा परिस्थितीत सध्या नितीश कुमार रेड्डी याला संघात स्थान दिले जाण्याची शक्यता सर्वाधिक आहे. रोहित शर्मा नुकताच दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. तो कुटुंबासोबत भारतात आहे. शुभमन गिल सरावादरम्यान जखमी झाला असून त्याच्या बोटाची दुखापत बरी होण्यास १४ दिवस लागण्याचा अंदाज आहे. यातच मोहम्मद शमीदेखील दुखापतीतून सावरलेला नाही. अशा स्थितीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसोबत दुसरा वेगवान गोलंदाज म्हणून नितीश कुमार रेड्डीचा पर्याय सर्वोत्तम ठरू शकेल.
भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्कल याने नुकतेच नितीश कुमार रेड्डीबाबत सूचक विधान केले. "नितीश रेड्डी हा नवखा आणि प्रतिभावान युवा खेळाडू आहे. तो अष्टपैलू खेळ करू शकतो. गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो एका बाजूने खिंड लढवण्यात दोन सक्षम वाटतो. पहिल्या दोन दिवसांच्या खेळात तो नक्कीच कमाल करू शकतो. त्याच्या गोलंदाजीबाबत बोलायचे तर तो स्टंपच्या रेषेत गोलंदाजी करतो. जगात प्रत्येक संघाला वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू संघात हवा असतो. आता (रोहितच्या अनुपस्थितीत) जसप्रीत बुमराह त्याचा वापर कसा करतो हे पाहायला हवे," असे मॉर्ने मॉर्कल म्हणाला.