नागपुरात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियन तंबू उखडून टाकला आहे. खापतीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या रवींद्र जडेजाने पहिल्याच डावात पाच विकेट घेतल्या आहेत. यामुळे १७७ वरच ऑस्ट्रेलियन खेळाडुंनी गुडघे टेकले आहेत. आता या रवींद्र जाडेजावर बॉलसोबत छेडछाड केल्याचा आरोप होऊ लागला आहे.
पहिल्या दिवशीचा खेळ संपल्यावर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये रवींद्र जाडेजा दिसत आहे. जाडेजा चेंडू टाकण्यापूर्वी मोहम्मद सिराजकडे जात आहे. तेव्हाच तो त्याच्या बोटांना काहीतरी लावत असल्याचे दिसत आहे. यावरून ऑस्ट्रेलियाई मीडिया आउटलेट Foxsports.com.au ने संशय व्यक्त केला आहे.
भारतद्वेष्टा इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने यावर लगेचच रॉकेल टाकण्य़ास सुरुवात केली आहे. तो त्याच्या स्पिनिंगच्या बोटावर काय लावत आहे? असे कधी पाहिले नाही, अशा शब्दांत या व्हिडीओवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हा व्हिडीओ त्याने रिट्विट केला आहे.
ऑस्ट्रेलियाची धावसंख्या पाच विकेटवर १२० धावा होती, तेव्हाचा हा व्हिडीओ आहे. तेव्हा खेळपट्टीवर अॅलेक्स कॅरी आणि पीटर हँड्सकॉम्ब फलंदाजीला आले होते. जडेजाने बोटांवर काय लावले होते, ते स्पष्ट झालेले नाही. परंतू, जडेजाने आज घेतलेले विकेट या परदेशी बाबूंना पचलेले दिसत नाहीय. त्यांनी एक प्रकारे भारतीय क्रिकेटपटूवर बॉल टेम्परिंगचा आरोप करण्याचा प्रयत्न केला आहे.