Mohammad Shami clean bowled Nathan Lyon, IND vs AUS 1st Test Video: कसोटी मालिका सुरू होण्याआधीच विविध कारणाने रडगाणं लावणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला मूळ सामन्यातही रडण्याची वेळ. भारतीय संघाने पाहुण्या संघाला पहिल्या कसोटी १३२ धावा आणि एका डावाने धूळ चारली. भारताचे त्रिकूट रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा आणि अक्षर पटेल यांनी दमदार कामगिरी करून दाखवली. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला १७७ धावाच करता आल्या. त्यानंतर भारताने कर्णधार रोहित शर्माच्या शतकाच्या बळावर ४०० धावा केल्या. दुसऱ्या डावात भारताने सुरूवातीपासूनच फिरकीपटूंच्या जोरावर ऑस्ट्रेलियाची पिसं काढली. त्यानंतर पाहुण्यांचे शेपूट गुंडाळण्याचे काम मोहम्मद शमीने चोख पार पाडले.
ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी कसोटीतील दुसरा डाव वाईट स्वप्नासारखा होता. भलेभले फलंदाज अश्विन-जाडेजाच्या फिरकीपुढे अक्षरश: गुडघे टेकून बसलेले दिसले. अश्विनने पाच बळी टिपले. जाडेजाने २ तर अक्षर पटेलने १ बळी टिपला. यात सर्वात लक्षणीय ठरला तो मोहम्मद शमीने नॅथन लायनचा उडवलेला त्रिफळा. ऑस्ट्रेलियाला पराभव समोर दिसत होता. ८८ धावांवर त्यांचे ८ बळी बाद झाले होते. त्यावेळी शमीने नॅथन लायनला खतरनाक यॉर्कर टाकला अन् त्याचा स्टंप उडवला. त्यानंतर शेवटचा बळीदेखील शमीने टिपला आणि सामना भारताने जिंकला. पाहा व्हिडीओ-
दरम्यान, दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची पडझड झाली. आर अश्विनने दुसऱ्याच षटकात उस्मान ख्वाजाला माघारी पाठवले. त्यानंतर रवींद्र अश्विनने कसोटीतील नंबर वन फलंदाज मार्नस लाबुशेनला पायचीत केले. अश्विन आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यात पुन्हा एकदा भारतीय फिरकीपटूने बाजी मारली. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांत अश्विन (९७) दुसऱ्या स्थानावर आला. अश्विनने ३१वेळा डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आणि कुंबळे यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का देताना कर्णधार पॅट कमिन्सला बाद केले. यष्टिरक्षक केएस भरतने सुरेख झेल टिपला.
मोहम्मद शमीने ९वी विकेट घेताना नॅथन लियॉनचा ( ८) त्रिफळा उडवला. स्टीव्ह स्मिथ नॉन स्ट्रायकर एंडला उभं राहून कांगारूंची पडझड पाहत राहिला. जडेजाने स्मिथची विकेट घेतली आणि भारताने जल्लोष सुरू केला, परंतु तो No Ball ठरला.शमीने शेवटची विकेट घेतली आणि ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ९१ धावांत गडगडला. भारताने १ डाव १३२ धावांनी हा सामना जिंकला.
Web Title: IND vs AUS 1st Test Video Mohammad Shami clean bowled Australian batter Nathan Lyon stump fly in the air
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.