Shubman Gill Team India, IND vs AUS 1st Test: भारतीय संघ बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघ यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) ची अंतिम फेरी गाठण्यासाठी भारतासाठी ही मालिका देखील खूप महत्त्वाची आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरपासून (शुक्रवार) पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यातून रोहित शर्मा आधीच बाहेर झाला आहे. त्याच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन झाल्याने, तो सध्या कुटुंबासोबत आहे. पण त्याच्या पाठोपाठ पहिल्या कसोटीतून युवा सलामीवीर शुबमन गिलदेखील बाहेर झाल्याची चर्चा आहे. त्याच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्याने त्याला २ आठवडे विश्रांतीला सल्ला देण्यात आल्याची माहिती आहे. पण आज भारतीय संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्कल याने त्याच्याबाबत महत्त्वाची माहिती दिली.
भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटीआधी आज बीसीसीआयतर्फे मॉर्ने मॉर्कलने पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्याने शुबमन गिलबद्दल माहिती दिली. यादरम्यान भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल म्हणाला, "शुबमन गिलच्या प्रकृतीत दिवसेंदिवस चांगली सुधारणा होत आहे. आम्ही पर्थ कसोटीच्या दिवशी सकाळी त्याच्या संघातील समावेशावर निर्णय घेऊ. गिल संघात खेळण्याबाबत आम्ही तरी अजूनही आशावादी आहोत," असे मॉर्ने मॉर्कल म्हणाला.
गिलला नेमके काय झाले?
एका रिपोर्टनुसार, शुभमन गिलला सराव सामन्यात दुसऱ्या स्लिपमध्ये झेल घेताना डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. दुखापतीनंतर तो खूप वेदनेत दिसला आणि त्याने लगेच स्कॅनसाठी मैदान सोडले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका सूत्राने वृत्तसंस्थेला सांगितले की, गिलच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले आहे आणि कसोटी सुरू होण्यास एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यासाठी तंदुरुस्त होणे जवळजवळ अशक्य आहे. अंगठ्याचे फ्रॅक्चर बरे होण्यासाठी साधारणपणे १४ दिवस लागतात. त्यानंतर एखाद्याने नियमितपणे सराव सत्रात परतणे अपेक्षित असते.
दरम्यान, भारताने ऑस्ट्रेलियामध्ये आपापसात दोन गट करून एक सराव सामना खेळला होता. त्यात गिलने पहिल्या डावात २८ धावा केल्या होत्या. मात्र दुसऱ्या प्रयत्नात त्याने नाबाद ४२ धावा केल्या.