नागपूर: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात प्रतिष्ठेच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील सलामीची लढत नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमवर रंगणार आहे. डब्ल्यूटीसी जामठा फायनल खेळण्यासाठी भारताला मालिका जिंकणे गरजेचे आहे.
रोहित शर्माची कसोटी कर्णधार या नात्याने सर्वांत मोठी परीक्षा असेल. ऑस्ट्रेलियाच्य पराभवाचा हिशेष चुकता करण्याचा प्रयत्न करेल. त्यांची गाठ भारताच्या 'फिरकी अस्त्राशी असेल. या मालिकेतून काहींची कारकीर्द घडेल, तर अपयशी राहिलेल्यांना बाहेरचा रस्ता दाखविला जाईल. याचदरम्यान भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने विराट कोहलीबाबत मोठं विधान केलं आहे.
हरभजन सिंग म्हणाला की, कोहलीची बॅट गेल्या तीन वर्षांपासून शांत आहे, पण त्याने वनडे आणि टी-२०मध्ये आपला फॉर्म पकडला आहे. त्याने दोन शतके झळकावली आहेत. आता कसोटीत देखील त्याच्याकडून आम्हाला शतकाची अपेक्षा आहे. हरभजन सिंग म्हणाला की, आता मला वाटते की हीच ती मालिका आहे आणि हीच ती वेळ आहे. ज्यामध्ये कोहलीची बॅट जबरदस्त चालेल. ज्या दिवशी त्याची बॅट चालते, तेव्हा काय होते हे आपल्या सर्वांना माहित आहे. या मालिकेत भारतीय संघाला विजय मिळवायचा असेल तर रनमशीन विराटला धावा काढाव्या लागतील.
दरम्यान, रोहित कमिन्सच्या उसळत्या चेंडूंवर पूलचा फटका मारण्यावर नियंत्रण राखेल? एश्टन एगर-नॅथन लियोनपुढे विराट कशी फटकेबाजी करेल? शुभमन गिलऐवजी सूर्याला संधी मिळेल? फिरकीपूटमध्ये कुलदीप, अक्षरपैकी अधिक उपयुक्त कोण? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.घरच्या मैदानावर २०१८ आणि २०२१ ला मालिका गमावल्याचे दु:ख कमिन्स आणि सहकाऱ्यांना आहे. २००४ नंतर ऑस्ट्रेलियाने भारतात मालिका विजय मिळविलेला नाही, कुलदीप यादव की अक्षर पटेल यांच्यापैकी कुणाला संधी द्यायची, याचा निर्णय घेताना रोहितची दमछाक होणार. भारताने चार फिरकीपटू खेळवल्यास रविचंद्रन अश्विनकडे नवा चेंडू सोपविला जाऊ शकतो.
रोहितची परीक्षा
रोहित हा दुखापत किंवा आजारामुळे मोठ्या संघांविरुद्धच्या मालिकांना मुकला आहे. मागच्यावर्षी दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत तो खेळला नव्हता. आता त्याच्याकडे विराटप्रमाणे भारताला डब्ल्यूटीसी फायनलमध्ये स्थान मिळवून देण्याची संधी असेल. रोहितच्या नेतृत्वात भारताने दोन कसोटी सामने खेळले आणि दोन्ही जिंकले. या मालिकेतील विजय त्याला महान कर्णधारांच्या यादीत स्थान मिळवून देऊ शकेल.
कसोटीची लोकप्रियता
पहिल्या सामन्याची ४४ हजार उपलब्ध तिकीटांपैकी जवळपास ४३ हजार तिकीटविक्री झाली हे विशेष. त्यामुळे कसोटी क्रिकेटची लोकप्रियता घसरत असल्याची बोंब ठोकणाऱ्यांना नागपूरकरांनी जोरदार उत्तर दिल्याची चर्चा क्रिकेटविश्वात रंगली आहे.
प्रतिस्पर्धी संघ असे-
भारत:रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, शुभमन गिल, रवींद्र जडेजा, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट आणि इशान किशन.
ऑस्ट्रेलिया: पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, अॅलेक्स केरी, मॅट रेनशॉ, पीटर हैंड्सकोम्ब, नॅथन लियोन, एश्टन एगर, स्कॉट बोलँड, लान्स मॉरिस, मिशेल स्वेपसन आणि टॉड मर्फी.