मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज मिचेल जॉन्सन यांच्यातील वाद मिटण्याची शक्यता कमीच आहे. जॉन्सनने पुन्हा एकदा कोहलीला लक्ष्य केले आहे. मेलबर्न कसोटी सुरू होण्यापूर्वी जॉन्सनने कोहलीच्या नेतृत्वक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याआधी जॉन्सनने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याच्यासोबतच्या वर्तनावरून कोहलीवर टीका केली होती. त्यात त्याच्या या नव्या वक्तव्याने आणखी भर टाकली आहे.
पर्थ कसोटीतील निकालानंतर दोन्ही कर्णधार समोरासमोर आले त्यावेळी हस्तांदोलन करताना कोहलीने पेनकडे दुर्लक्ष केले. त्यावरून जॉन्सन म्हणाला होता,''सामन्याचा निकाल काही असो, जेव्हा तुम्हा हस्तांदोलन करता त्यावेळी एकमेकांकडे पाहायला हवे आणि विजयी कर्णधाराचे कौतुक करायला हवे. कोहलीने तसे केले नाही. त्याने पेनचा अपमान केला आणि त्याचे हे वागणे अमान्य आहे.''
जॉन्सनने यावेळी कोहलीच्या नेतृत्वावर बोट ठेवताना त्यापेक्षा अजिंक्य रहाणे उत्तम कर्णधार असल्याचा दावा केला. 2014-15च्या अॅशेस मालिकेतील हीरो ठरलेल्या जॉन्सनने चाहत्याच्या प्रश्नावर उत्तर देताना कोहलीवर निशाणा साधला. तो म्हणाला,''रहाणे हा चांगला कर्णधार बनू शकतो. त्याच्याकडे ती क्षमता आहे. त्याच्याकडे खिलाडूवृत्ती, तो आक्रमकपणा आहे. युवा खेळाडूंसाठी तो योग्य आदर्श आहे.''