India vs Australia 2022-23: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला ९ फेब्रुवारी सुरू होणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीने ही मालिका भारतासाठी महत्त्वाची आहे. नागपूर येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघ भारतात दाखल झाला आहे. पण, या कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन संघ एकही सराव सामना खेळणार नाही. त्यामागचं कारण सांगताना ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूने भारतावर आरोप केले आहेत.
ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज इयान हिलीने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला सुरुवात होण्यापूर्वी भारतावर निशाणा साधला आहे. तो म्हणाला की,''पॅट कमिन्सचा संघ आगामी कसोटी मालिकेपूर्वी उपखंडात सराव सामने खेळत नाही कारण यजमान देशाने दिलेल्या सुविधांवर त्यांचा विश्वास नाही.'' चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एकही सराव सामना खेळणार नाही. संघाचा सदस्य उस्मान ख्वाजा याने नुकतेच सांगितले की, सराव सामना खेळण्यात काही अर्थ नाही कारण सराव सामन्यासाठी तयार केलेले विकेट आणि भारतातील प्रत्यक्ष सामन्यासाठी असलेली खेळपट्टी यात खूप फरक असतो.
ख्वाजा यांनी या महिन्याच्या सुरुवातीला म्हटले होते की, '' प्रत्यक्ष सामन्यात फिरकीला अनुकूल खेळपट्टी असते, पण जेव्हा सराव सामन्यांना गॅबासारखी गवत असलेली खेळपट्टी असते. मग सराव सामना खेळण्यात काय अर्थ आहे.'' हिलीने ख्वाजाच्या वक्तव्याचे समर्थन केले. ''दौऱ्यातील सराव सामने आणि प्रत्यक्ष सामन्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या विकेट्स तयार करणे मला आवडत नाही, कारण हा विश्वासाचा भंग आहे,'' असे हिलीने सांगितले. ऑस्ट्रेलियाने २००४-०५ पासून भारतात एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही.
ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा 9 ते 13 फेब्रुवारी, पहिला कसोटी सामना, नागपूर17 ते 21 फ्रेब्रुवारी, दुसरा कसोटी सामना, दिल्ली1 ते 5 मार्च, तिसरा कसोटी सामना, धर्मशाला9 ते 13 मार्च, चौथा कसोटी सामना, अहमदाबाद
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"