नागपूर, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : महेंद्रसिंग धोनी, हा अनेकांच्या गळ्यातील ताईत आहे. धोनीचा एक चाहता वर्ग आहे आणि हे चाहते त्याच्यासाठी काहीही करायला तयार असतात. त्यामुळे सोशल मीडियावर धोनीचे भरपूर फॅन्स आहेत. असाच एक फॅन नागपूरमधील जामठ्याच्या मैदानातही पाहायला मिळाला.
भारताचा पहिला डा 250 धावांवर आटोपला. धोनीला या सामन्यात एकही धाव करता आली नाही. पण विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने 250 धावा पूर्ण केल्या. त्यानंतर भारतीय संघ जेव्हा क्षेत्ररक्षणासाठी आला तेव्हा ही घटना घडल्याचे पाहायला मिळाले.
धोनीच्या जर्सीचा नंबर सात आहे. याच क्रमांकाची पांढऱ्या रंगाची जर्सी या चाहत्याने परीधान केली होती. हा चाहता जेव्हा मैदानात धावत आला तेव्हा धोनीने त्याला पाहिले. हा चाहता जेव्हा धोनीच्या जवळ आला तेव्हा धोनी त्याला पाहून थोडा पुढे पळाला. यावेळी संघ सहकाऱ्यांमध्ये चांगलाच हशा पिकला. पण धोनीने या चाहत्याला नाराज केले नाही. धोनीने या चाहत्याला आपल्या जवळ बोलावले. त्यावेळी या चाहत्याने धोनीचे पाय धरले.
सर्व छाया : विशाल महाकाळकर.
भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या दमदार शतकानंतरही भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला 250 धावांवरच समाधान मानावे लागले. आतापर्यंत फॉर्मात असलेल्या फलंदाजांना या सामन्यात लय सापडली नाही. त्यामुळेच भारताला प्रथम फलंदाजी करताना भारताला ऑस्ट्रेलियापुढे 251 धावा करता आल्या.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली आणि भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले. भारताचे खाते उघडले नसतानाही सलामीवीर रोहित शर्मा बाद झाला. त्यानंतर शिखर धवन, अंबाती रायुडू, विजय शंकर यांनी चांगली फटकेबाजी केली. पण त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. केदार जाधव 11, तर धोनीला आपले खातेही उघडता आले नाही. संघाची पडझड होताना मात्र कोहली एकाबाजूला ठामपणे उभा होता. पण कोहलीलाही अखेरपर्यंत फलंदाजी करता आली नाही. मोठा फटका मारण्याच्या नादात कोहलीही बाद झाला. कोहलीने 120 चेंडूंत 10 चौकारांच्या मदतीने 116 धावा केल्या. कोहली बाद झाल्यावर भारताचा डाव फक्त दोन धावांमध्ये आटोपला.