Join us  

IND vs AUS 2nd ODI Live : १६ चौकार, ६ षटकार! ऑस्ट्रेलियन IPL च्या तयारीला लागले, भारताला ११ षटकांत हरवले; धू धू धुतले 

India vs Australia 2nd ODI Live Update : ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या वन डे सामन्यात टीम इंडियाचे वस्त्रहरण केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 5:33 PM

Open in App

India vs Australia 2nd ODI Live Update : ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या वन डे सामन्यात टीम इंडियाचे वस्त्रहरण केले. मिचेल स्टार्क, सीन एबॉट व नॅथन एलिस या जलदगती गोलंदाजांनी भारताला २६ षटकांत ऑल आऊट केले. त्यानंतर मिचेल मार्श व ट्रॅव्हिस हेड यांनी भारतीय गोलंदाजांना धू धू धुतले... मार्शने चौकार-षटकाराने १० चेंडूंत ५० धावा चोपल्या. दुसऱ्या बाजूने हेडनेही चोपून काढले. मार्श तर प्रेक्षकांकडून कॅचिंग प्रॅक्टीस करून घेतोय की काय असे जाणवले. ऑस्ट्रेलियाने ११ षटकांच्या आतच हा सामना जिंकला.

टीम इंडियाचा २६ षटकांत खेळ खल्लास! मिचेल स्टार्कने घेतल्या पाच विकेट्स, नंतर सारेच परतले माघारी

 स्टीव्ह स्मिथ कर्णधार म्हणून किती धोकादायक आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. फॉर्मात असलेल्या मिचेल मार्शकडून त्याने सलग षटकं फेकून घेतली अन् मार्शनेही चार विकेट्स घेत त्याचा विश्वास सार्थ ठरवला. त्यानंतर सीन एबॉट व नॅथन एलिस या जलदगती गोलंदाजांनी धक्के दिले. स्मिथने ( Steve Smith) दोन अविश्वसनीय झेल घेताना रोहित शर्मा व हार्दिक पांड्या यांना माघारी पाठवले. भारताचा संपूर्ण संघ ११७ धावांत माघारी परतला. मिचेल स्टार्कने ५३ धावांत ५ विकेट्स घेतल्या. सीन एबॉचटने २३ धावांत ३ आणि नॅथन एलिसने १३ धावांत २ धक्के दिले.  

मिचेल स्टार्कने सुरुवातीच्या चार फलंदाजांना माघारी पाठवले. शुबमन गिल ( ०), रोहित शर्मा ( १३), सूर्यकुमार यादव ( ०) आणि  लोकेश राहुल( ९) स्वस्तात माघारी परतले.  हार्दिक पांड्याला ( १) सीन एबॉटने माघारी पाठवले. स्टीव्ह स्मिथने हवेत झेप घेताना एका हाताने अफलातून झेल टिपला. विराट एका बाजूने भारताची खिंड लढवत होता आणि त्याला रवींद्र जडेजाची चांगली साथ मिळाली. या दोघांनी ३६ चेंडूंत २२ धावांची भागीदारी केली, परंतु नॅथन एलिसने भारताला मोठा धक्का दिला. ३५ चेंडूंत ३१ धावा करणाऱ्या विराटला त्याला LBW केले. एलिसने त्याच्या पुढच्या षटकात जडेजालाही ( १६) माघारी पाठवले.  त्यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारताचे शेपूट गुंडाळले. अक्षर पटेल २९ धावांवर नाबाद राहिला. 

ऑस्ट्रेलियाविरुद्धची भारताची ही वन डे क्रिकेटमधील तिसरी निचांक कामगिरी ठरली. यापूर्वी १९८१ मध्ये सिडनीत भारतीय संघ ६३ धावांत तंबूत परतला होता आणि त्यानंतर २००० मध्ये सिडनीत १०० धावांवर ऑल आऊट झाला होता.  मिचेल स्टार्कने वन डे क्रिकेटमध्ये नऊ वेळा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम करताना शाहिद आफ्रिदी व ब्रेट ली यांच्याशी बरोबरी केली. या विक्रमात वकार युनूस ( १३ ) व मुथय्या मुरलीधरन ( १०) हे आघाडीवर आहेत. 

मिचेल मार्श सामना लवकर संपवण्याच्या प्रयत्नात दिसला... तो भारतीय गोलंदाजांना कुटून काढत होता अन् समालोचन करणारे सुनील गावस्कर म्हणाले हा जणू नेट प्रॅक्टीस करतोय.. त्याने व ट्रॅव्हीस हेड यांनी पहिल्या पाच षटकांत ४९ धावा केल्या आणि त्यापैकी ३१ धावा या ( ४ चौकार व २ षटकार) मार्शच्याच होत्या. भारताची १३ षटकांत ५ बाद ६५ अशी अवस्था होती, तर ऑस्ट्रेलियाने ६ षटकांत ६६ धावा कुटल्या. मार्श कोणत्याच भारतीय गोलंदाजाला जुमानत नव्हता अन् चेंडू सीमापार तडातड पाठवत होता. त्याने २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना ५ चौकार व ५ षटकार खेचले. हेडनेही २९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. हेड ३० चेंडूंत १० चौकारांसह ५१ धावांवर नाबाद राहिला, तर मार्शने ३५ चेंडूंत ६ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने नाबाद ६६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने ११ षटकांत बिनबाद १२१ धावा करून सामना जिंकला अन् मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवली. 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियास्टीव्हन स्मिथरोहित शर्मा
Open in App