Join us  

IND vs AUS 2nd ODI Live : वन डे इतिहासातील भारताचा हा लाजीरवाणा पराभव ठरला; वाचा रोहित शर्मा काय म्हणाला... 

मिचेल स्टार्क, सीन एबॉट व नॅथन एलिस या जलदगती गोलंदाजांनी भारताला २६ षटकांत ऑल आऊट केले. त्यानंतर मिचेल मार्श व ट्रॅव्हिस हेड यांनी भारतीय गोलंदाजांना धू धू धुतले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 5:59 PM

Open in App

India vs Australia 2nd ODI Live Update : ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या वन डे सामन्यात टीम इंडियाचे वस्त्रहरण केले. मिचेल स्टार्क, सीन एबॉट व नॅथन एलिस या जलदगती गोलंदाजांनी भारताला २६ षटकांत ऑल आऊट केले. त्यानंतर मिचेल मार्श व ट्रॅव्हिस हेड यांनी भारतीय गोलंदाजांना धू धू धुतले आणि ११ षटकांत विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाने १० विकेट्स व २३४ चेंडू राखून हा सामना जिंकताना मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. चेंडू राखण्याच्या बाबतीत भारताचा हा सर्वात मोठा पराभव ठरला. ऑस्ट्रेलियाचाही हा मोठा विजय ठरला. यापूर्वी त्यांनी अमेरिकेवर २५३ चेंडू व ९ विकेट्स राखून विजय मिळवला होता.  

 

स्टीव्ह स्मिथ कर्णधार म्हणून किती धोकादायक आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. फॉर्मात असलेल्या मिचेल स्टार्ककडून त्याने सलग षटकं फेकून घेतली अन् मार्शनेही चार विकेट्स घेत त्याचा विश्वास सार्थ ठरवला. त्यानंतर सीन एबॉट व नॅथन एलिस या जलदगती गोलंदाजांनी धक्के दिले. स्मिथने ( Steve Smith) दोन अविश्वसनीय झेल घेताना रोहित शर्मा व हार्दिक पांड्या यांना माघारी पाठवले. भारताचा संपूर्ण संघ ११७ धावांत माघारी परतला. मिचेल स्टार्कने ५३ धावांत ५ विकेट्स घेतल्या. सीन एबॉचटने २३ धावांत ३ आणि नॅथन एलिसने १३ धावांत २ धक्के दिले.  विराट कोहली ( ३१) आणि अक्षर पटेल ( २९*) यांनी संघर्ष केला.

  

मिचेल मार्श सामना लवकर संपवण्याच्या प्रयत्नात दिसला. तो भारतीय गोलंदाजांना कुटून काढत होता अन् समालोचन करणारे सुनील गावस्कर म्हणाले हा जणू नेट प्रॅक्टीस करतोय. मार्श कोणत्याच भारतीय गोलंदाजाला जुमानत नव्हता अन् चेंडू सीमापार तडातड पाठवत होता. त्याने २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना ५ चौकार व ५ षटकार खेचले. हेडनेही २९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. हेड ३० चेंडूंत १० चौकारांसह ५१ धावांवर नाबाद राहिला, तर मार्शने ३५ चेंडूंत ६ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने नाबाद ६६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने ११ षटकांत बिनबाद १२१ धावा करून सामना जिंकला अन् मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवली. 

रोहित शर्मा म्हणाला...आम्ही आमच्या क्षमतेनुसार नाही खेळलो आणि त्यामुळे प्रचंड निराश आहे... पहिल्याच षटकात शुबमन गिलची विकेट पडली. त्यानंतर मी आणि विराट कोहलीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, माझी विकेट पडली अन् नंतर फलंदाज पटापट माघारी परतले... ही खेळपट्टी ११७ धावांची नव्हती.. इथे ३०० धावा झाल्या असत्या, परंतु आम्ही तसा खेळ केला नाही.  आम्ही विकेट गमावल्या आणि त्यामुळे पुनरागमन करणे अवघड झाले. मिचेल स्टार्कने चांगली गोलंदाजी केली आणि हे तो वर्षानुवर्षे करतोय ... तो त्याच्या बलस्थान ओळखून गोलंदाजी करतोय आणि आजच्या सामन्याचे श्रेय त्याला द्यायला हवे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

  

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्मा
Open in App