India vs Australia 2nd ODI Live Update : ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या वन डे सामन्यात टीम इंडियाचे वस्त्रहरण केले. मिचेल स्टार्क, सीन एबॉट व नॅथन एलिस या जलदगती गोलंदाजांनी भारताला २६ षटकांत ऑल आऊट केले. त्यानंतर मिचेल मार्श व ट्रॅव्हिस हेड यांनी भारतीय गोलंदाजांना धू धू धुतले आणि ११ षटकांत विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाने १० विकेट्स व २३४ चेंडू राखून हा सामना जिंकताना मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. भारताच्या ११७ धावांचा पाठलाग करताना ट्रॅव्हिस हेड ३० चेंडूंत १० चौकारांसह ५१ धावांवर नाबाद राहिला, तर मार्शने ३५ चेंडूंत ६ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने नाबाद ६६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने ११ षटकांत बिनबाद १२१ धावा करून सामना जिंकला.
टीम इंडियाचे वस्त्रहरण! नावावर नोंदवले गेले नको नकोसे विक्रम; ऑस्ट्रेलियाचे पराक्रम
या सामन्यात सूर्यकुमार यादव पुन्हा गोल्डन डकवर बाद झाला. श्रेयस अय्यरने दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे सूर्याला वन डे संघात संधी मिळाली, परंतु ट्वेंटी-२० प्रमाणे त्याला या फॉरमॅटमध्ये सातत्य राखता आलेले नाही. मागील १० वन डे सामन्यांत सूर्याने ९, ८, ४, ३४*, ६, ४, ३१, १४, ० , ० अशी कामगिरी केली आहे आणि ही भारतासाठी चिंतेची बाब ठरतेय. ट्वेंटी-२० क्रमवारीत नंबर १ फलंदाज सूर्या वन डेत फेल जाताना दिसतोय. महान फलंदाज सुनील गावस्कर यांनीही सूर्याचे कान टोचले आहे आणि त्याला फलंदाजी प्रशिक्षकाकडे जाण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान, रोहितही सूर्याच्या कामगिरीवर फार खूश नसल्याचे त्याच्या बोलण्यातून जाणवले. तो म्हणाला, मी आधीची म्हटलं आहे की ज्या खेळाडूंमध्ये क्षमता आहे त्यांना पुरेशी संधी देण्यात येईल. सूर्यकुमार यादवच्या बाबतीतही हिच गोष्ट आहे. त्याच्यात क्षमता आहे आणि वन डेत धावा करण्याची गरज आहे, हे त्यालाही माहित्येय. त्यामुळे संधी दिली गेली आहे, मग त्याला असं वाटायला नको की पुरेशी संधी मिळाली नाही. अय्यरच्या अनुपस्थितीत त्याने सातत्याने धावा करायला हव्यात.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"