R Ashwin, IND vs AUS 2nd ODI Live Updates: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ९९ धावांनी विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ३९९ धावांची मजल मारली होती. शुबमन गिलच्या १०४, श्रेयस अय्यरच्या १०५ आणि सूर्यकुमार यादवच्या नाबाद ७२ धावांमुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली. ४०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पावसाने ऑस्ट्रेलियाचा डाव रोखला. पावसानंतर ऑस्ट्रेलियाला ३३ षटकांत ३१७ धावांचे नवे आव्हान मिळाले. पण पावसानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव पत्त्यासारखा कोसळला. रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरूंग लावला आणि इतर गोलंदाजांनी त्याला चांगलीच साथ दिली.
भारतीय फलंदाजांनी केली ऑस्ट्रेलियाची धुलाई
ऋतुराज गायकवाड ८ धावांवर बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि सलामीवीर शुबमन गिल यांच्यात द्विशतकी भागीदारी झाली. श्रेयस अय्यरने ९० चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने त्याने १०५ धावा केल्या. तर शुबमन गिलने ९७ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांच्या बळावर १०४ धावा केल्या. या दोघांनंतर कर्णधार केएल राहुलने डाव सांभाळला. इशान किशनने त्याला चांगली साथ दिली. पण किशन १८ चेंडूत २ चौकार आणि २ षटकार मारत ३१ धावांवर बाद झाला. मग सूर्यकुमार मैदानात आला. राहुल ३८ चेंडूत ५२ धावा काढून माघारी परतला. त्यानंतर सूर्यकुमार यादवने तुफान फटकेबाजी केली. त्याने ३७ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद ७२ धावा केल्या. रविंद्र जाडेजानेही ९ चेंडूत १३ धावा केल्या. त्यामुळे भारताला ३९९ धावांची मजल मारून दिली. ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरॉन ग्रीनने २ तर हेजलवूड, सीन अबॉट आणि अडम झम्पा यांनी प्रत्येकी १-१ बळी टिपला.
भारतीय फिरकीने गुंडाळली ऑस्ट्रेलियन फलंदाजी
४०० धावांचे आव्हान घेऊन मैदानात आलेल्या ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या षटकात दोन धक्के बसले. प्रसिध कृष्णाने आधी मॅथ्यू शॉर्टला ९ धावांवर तर स्टीव्ह स्मिथला पहिल्याच चेंडूवर माघारी धाडले. डेव्हिड वॉर्नरने संघर्ष केला. ९ षटकानंतर पावसाचा व्यत्यय आला. पाऊस थांबल्यानंतर ऑस्ट्रेलियाला ३१७ धावांचे नवे आव्हान मिळाले. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन फलंदाज केवळ हजेरी लावून तंबूत परतले. रविचंद्रन अश्विनने आधी मार्नस लाबूशेनला २७ धावांवर माघारी पाठवले. डेव्हिड वॉर्नरने अर्धशतक ठोकले. पण अश्विनने वॉर्नर (५३) आणि इग्लिश (६) दोघांना एकाच षटकात बाद केले. त्यामुळे १०१ धावांवर ऑस्ट्रेलियाचे ५ बळी बाद झाले.
अश्विननंतर रविंद्र जाडेजाने आपल्या फिरकीची जादू दाखवली. त्याने अलेक्स कॅरीला १४ धावांवर बाद केले. नंतर इशान किशनने कॅमेरॉन ग्रीनला १९ धावांवर धावचीत केले. तर जाडेजाने पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाला धक्का देत अडम झम्पाला ५ धावांवर त्रिफळाचीत केले. त्यानंतर अबॉटने अर्धशतक ठोकले. पण त्याचे प्रयत्न प्रचंड तोकडे पडले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव २१७ धावांत आटोपला. अश्विन-जाडेजाने प्रत्येकी ३, प्रसिध कृष्णाने २ तर शमीने १ बळी टिपला.
मालिकेतील तिसरा आणि अंतिम वन डे सामना राजकोटला २७ सप्टेंबरला रंगणार आहे.
Web Title: IND vs AUS 2nd ODI Live Updates India beat Australia by 99 Runs to win One Day Series before World Cup 2023
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.