Join us  

Video: दे धक्का! प्रसिध कृष्णाचे २ चेंडूत २ बळी; 'कॅप्टन स्मिथ' पहिल्या बॉलवर तंबूत

डावाच्या दुसऱ्याच षटकात ऑस्ट्रेलियाला बसले मोठे झटके

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 7:51 PM

Open in App

Prasidh Krishna Steve Smith, IND vs AUS 2nd ODI Live Updates: भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात ३९९ धावा केल्या. शुबमन गिल, श्रेयस अय्यरची शतकं आणि सूर्यकुमार यादव, कर्णधार केएल राहुलची अर्धशतकं यांच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला ४०० धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून झंझावाती सुरूवातीची अपेक्षा होती पण त्यांना पहिल्याच टप्प्यात फटका बसला. प्रसिध कृष्णाने भेदक मारा करत भारतीय संघाला चांगली सुरूवात मिळवून दिली.

४०० धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकात मोहम्मद शमीला मॅथ्यू शॉर्टने दोन चौकार लगावले. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आक्रमक खेळ करणार हे निश्चित होते. पण तशातच दुसरे षटक घेऊन प्रसिध कृष्णा आला. त्याने सामन्यात वेगळीच रंगत आणली. त्याने टाकलेल्या पहिल्या चेंडूवर मॅथ्यू शॉर्टने हवाई फटका खेळला. चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने गेला आणि अश्विनने अतिशय अप्रतिम असा झेल टिपला. त्यानंतर आजचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ मैदानात आला. प्रसिध कृष्णाने ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला. स्मिथसाठी तो पहिलाच चेंडू असला तरी त्यावर धाव घेण्याचा मोह त्याला आवरला नाही. त्यामुळे त्याने फटका मारला, पण चेंडू स्लिपमध्ये गेला आणि शुबमन गिलने उत्तम झेल टिपत संघाला मोठा बळी मिळवून दिला.

तत्पूर्वी, स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने प्रथम भारताला फलंदाजीची संधी दिली. मराठमोळा सलामीवीर ऋतुराज गायकवाड ८ धावांवर बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि सलामीवीर शुबमन गिल यांच्यात द्विशतकी भागीदारी झाली. श्रेयस अय्यरने ९० चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने त्याने १०५ धावा केल्या. तर शुबमन गिलने ९७ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांच्या बळावर १०४ धावा केल्या. या दोघांनंतर कर्णधार केएल राहुलने डाव सांभाळला. इशान किशनने त्याला चांगली साथ दिली. पण किशन १८ चेंडूत २ चौकार आणि २ षटकार मारत ३१ धावांवर बाद झाला. मग सूर्यकुमार मैदानात आला. राहुल ३८ चेंडूत ५२ धावा काढून माघारी परतला. त्यानंतर सूर्यकुमार यादवने तुफान फटकेबाजी केली. त्याने ३७ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद ७२ धावा केल्या. रविंद्र जाडेजानेही ९ चेंडूत १३ धावा केल्या. त्यामुळे भारताला ३९९ धावांची मजल मारून दिली. ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरॉन ग्रीनने २ तर हेजलवूड, सीन अबॉट आणि अडम झम्पा यांनी प्रत्येकी १-१ बळी टिपला.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियास्टीव्हन स्मिथशुभमन गिलसूर्यकुमार अशोक यादव