Shreyas Iyer Century, IND vs AUS Live Updates: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात श्रेयस अय्यरने दमदार शतक झळकावले. ऋतुराज गायकवाड स्वस्तात बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आला. त्याने सुरूवातीपासून कांगारुंना झोडपायला सुरूवात केली. दमदार फलंदाजी करत अय्यरने आधी ४१ चेंडूत अर्धशतक झळकावले. त्यानंतर काही काळ संथगतीने खेळ केल्यावर अखेर ८६ चेंडूत शतक ठोकून बॅट उंचावली.
--
श्रेयस अय्यर गेले काही महिने दुखापतीमुळे त्रस्त होता. त्याने काही दिवसांपूर्वीच संघात पुनरागमन केले. तसेच त्याला वर्ल्ड कपसाठीही संघात स्थान मिळाले. त्यामुळे त्याच्या तंदुरूस्तीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. पण सर्व प्रश्नांना आणि टीकाकारांना श्रेयस अय्यरने आज उत्तर दिले. मैदानात आल्यापासूनच त्याने आपली छाप उमटवली. त्याने सुरूवातील आक्रमक खेळी करत अर्धशतक झळकावले. त्यानंतर स्पिनर्स गोलंदाजीला आल्यावर संयमी खेळ केला. मध्ये मध्ये फटकेबाजी करत त्याने अखेर ८६ चेंडूत आपले शतक पूर्ण केले.
शतक पूर्ण होताच, सीन अबॉटने स्वत:च्याच गोलंदाजीवर त्याचा अप्रमित झेल टिपला. पण त्याला नाबाद ठरवण्यात आले. चेंडूला जमिनीला टेकल्याचे कारण त्यावेळी दिले गेले. त्यानंतर पुढच्या चेंडूवर अय्यरने चौकार लगावला. पण त्यापुढच्याच चेंडूवर तो झेलबाद झाला.
दरम्यान, अय्यरच्या शतकामुळे वर्ल्डकपमधील टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनचा पेच अधिक वाढला असल्याचे बोलले जात आहे.