Suryakumar Yadav Shubman Gill Shreyas Iyer, IND vs AUS 2nd ODI Live Updates: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ३९९ धावांची मजल मारली आणि पाहुण्यांना ४०० धावांचे आव्हान दिले. शुबमन गिलच्या १०४ आणि श्रेयस अय्यरच्या १०५ धावांच्या शतकांमुळे भारताला मोठ्या धावसंख्येची पायाभरणी करता आली. त्यानंतर कर्णधार लोकेश राहुलने ५२ धावांची खेळी केली. तर शेवटच्या टप्प्यात सूर्यकुमारने नाबाद ७२ धावा करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरॉन ग्रीनने सर्वाधिक २ बळी टिपले.
ऑस्ट्रेलियाने कर्णधार बदलून स्टीव्ह स्मिथकडे संघाचे नेतृत्व दिले आणि पॅट कमिन्सला विश्रांती दिली. स्टीव्ह स्मिथने भारताला प्रथम फलंदाजीची संधी दिली. या संधीचं भारतीय फलंदाजांनी सोनं केलं. मराठमोळा सलामीवीर ऋतुराज गायकवाड पहिल्याच षटकात २ चौकार मारून मोकळा झाला, पण त्यानंतर ८ धावांवर तो लगेच बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि सलामीवीर शुबमन गिल यांच्यात द्विशतकी भागीदारी झाली. श्रेयस अय्यरने सुरूवातीपासूनच आक्रमणाला सुरूवात केली. त्याने ४१ चेंडूत अर्धशतक लगावले. त्यानंतर ८६ चेंडूत शतक पूर्ण केले. शतकानंतर त्याला एक जीवनदान मिळाले पण त्याचा त्याला फारसा फायदा मिळाला नाही. ९० चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने त्याने १०५ धावा केल्या.
दुसरीकडे शुबमन गिलने देखील फटकेबाजी सुरू ठेवली. गिलने सुरूवातीला ३७ चेंडूत अर्धशतक ठोकले. त्यानंतर त्याने धावा जमवण्याची गती अधिकच वाढवली. ९२ चेंडूमध्ये त्याने शतक पूर्ण केले. त्याने आपल्या १०४ धावांच्या खेळीत ६ चौकार आणि ४ षटकार खेचले.
गिल माघारी परतल्यानंतर कर्णधार केएल राहुलने इशान किशनच्या साथीने फटकेबाजी सुरू केली. इशान किशन मोठा फटका मारताना १८ चेंडूत ३१ धावांवर बाद झाला. त्याने २ चौकार आणि २ षटकार मारले. त्यानंतर सूर्यकुमार यादवने राहुलला साथ दिली. राहुलने अर्धशतक ठोकले पण तो ३८ चेंडूत ५२ धावांवर बाद झाला.
त्याच्यानंतर सूर्यकुमार यादवने डाव ताब्यात घेतला. सूर्याने तुफानी फटकेबाजी केली. जागेवरूनच हवेत फटके खेळत त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. कॅमेरॉन ग्रीनला सूर्यकुमारने सलग चार षटकार मारले. डाव संपेर्पंयत सूर्यकुमार नाबाद राहिला. त्याने ३७ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद ७२ धावा केल्या. रविंद्र जाडेजाने (९ चेंडूत १३) त्याला चांगली साथ देत संघाला ३९९ धावांची मजल मारून दिली.
--
ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरॉन ग्रीनने २ तर हेजलवूड, सीन अबॉट आणि अडम झम्पा यांनी प्रत्येकी १-१ बळी टिपला.