मुंबई: जो लोकेश राहुल गेल्या काही सामन्यांपासून क्रिकेटचाहत्यांसाठी व्हिलन ठरला होता, तोच राहुल आणि जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला रवींद्र जडेजा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात हिरो ठरले. राहुल आणि जडेजा यांनी केलेल्या नाबाद शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने कांगारुंना ५ गड्यांनी नमविले. यासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
आता भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा दूसरा सामना १९ मार्च रोजी विशाखापट्टणम येथे होणार आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने पाच गडी राखून शानदार विजय मिळवला होता, त्यामुळे त्यांचे मनोबल खूप उंचावले आहे. दुसरा एकदिवसीय सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता खेळवला जाईल.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सर्वांच्या नजरा टीम इंडियाच्या प्लेइंग XI वर असतील. कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या वनडेसाठी संघात सामील होणार असल्याने भारतीय संघात बदल होणे निश्चित आहे. रोहित शर्मा पहिल्या सामन्यात कौटुंबिक कारणांमुळे खेळू शकला नाही आणि त्याच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्याने संघाची धुरा सांभाळली. मात्र आता रोहितच्या पुनरागमनामुळे प्लेइंग XI मधून कोणता खेळाडू बाहेर बसायला लागू शकते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मात्र सूर्यकुमार यादव किंवा इशान किशनला दुसऱ्या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
सूर्यकुमार यादवला दुसऱ्या सामन्यात संधी न मिळण्याची शक्यता अधिक आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सतत फ्लॉप होत आहे. असं असलं तरी, इशान किशन मधल्या फळीतही फलंदाजीत माहिर आहे आणि त्याने काही महिन्यांपूर्वी एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतकही झळकावले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात सूर्यकुमार यादवला खातेही उघडता आलं नाही आणि तो पहिल्याच चेंडूवर मिचेल स्टार्कच्या हातून एलबीडब्ल्यू आऊट झाला. तसे, सलामीवीर इशान किशनची कामगिरीही निराशाजनक होती. तीन धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर इशानला मार्कस स्टॉइनिसने एलबीडब्ल्यू आऊट केले.
भारताची संभाव्य प्लेइंग XI: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.
ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेइंग XI: डेव्हिड वॉर्नर / ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, जोश इंग्लिस, शॉन अॅबॉट, मिचेल स्टार्क, अॅडम झम्पा.