मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या करू दिली नाही. पावसाच्या सततच्या आगमनामुळे दोन वेळा सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले. पण, भारतीय फलंदाज मैदानावर येताच पावसाचे आगमन होत होते आणि त्यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड होत होता. भारतीय डगआऊटमध्ये चिंतेचे वातावरण होते, तर ऑस्ट्रेलियन खेळाडू आनंदात होते. सामना सुरू होणार की नाही याबाबतही प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगली. दहा मिनिटांत ही परिस्थिती अशीच राहिली तर भारताला पाच षटकांचा सामना खेळावा लागेल...
भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकात कांगारूंचा कर्णधार अॅरोन फिंचला माघारी पाठवले. त्यानंतर डावखुरा जलदगती गोलंदाज खलील अहमदने त्याचा करिष्मा दाखवला. त्याने एका षटकाच्या अंतराने ख्रिस लीन आणि डी'अॅर्सी शॉर्टला बाद केले. तत्पूर्वी या दोघांनाही जीवदान मिळाले होते. जसप्रीत बुमराने मार्कस स्टोईनिसला बाद केले. जलदगती गोलंदाजांच्या प्रभावानंतर फिरकी गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला धक्के दिले. ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ अवघ्या 62 धावांवर माघारी परतला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला धक्के बसत राहिले. 19 षटकांत त्यांच्या 7 बाद 132 धावा झाल्या होत्या.
जसप्रीत बुमरा 19वे षटक टाकत होता. दुसरा चेंडू टाकल्यानंतर पावसाचे आगमन झाले आणि प्रेक्षक स्टेडियमबाहेर जाऊ लागले. बुमराने अंपायरकडे सामना थांबवण्याबाबत विचारणा केली, परंतु त्यांनी दाद दिली नाही. त्यानंतर कोहली अंपायरकडे धावत आला आणि कारण विचारू लागला. षटक पूर्ण झाल्यानंतर पावसाचे आगमन झाले. थोड्या थोड्या विश्रांतीनंतर सतत पाऊस येत असल्याने भारताला दोन वेळा सुधारित लक्ष्य देण्यात आले. मात्र पाऊस पुढील दहा मिनिटे न थांबल्यास भारताला पाच षटकांत 46 धावांचे लक्ष्य देण्यात येईल.