मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाला मोठा पल्ला गाठू दिला नाही. पावसाच्या रिपरिपमुळे हवामानात गारवा आला होता. त्यामुळे नाणेफेक जिंकताच विराट कोहलीने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी त्याचा निर्णय योग्य ठरवला. पावसाच्या व्यत्ययामुळे 19 व्या षटकांत सामना थांबवण्यात आला होता. मात्र भारतासमोर दुसऱ्यांदा सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले. भारताला 11 षटकांत 90 धावा करायच्या आहेत.
भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकात कांगारूंचा कर्णधार अॅरोन फिंचला माघारी पाठवले. त्यानंतर डावखुरा जलदगती गोलंदाज खलील अहमदने त्याचा करिष्मा दाखवला. त्याने एका षटकाच्या अंतराने ख्रिस लीन आणि डी'अॅर्सी शॉर्टला बाद केले. तत्पूर्वी या दोघांनाही जीवदान मिळाले होते. जसप्रीत बुमराने मार्कस स्टोईनिसला बाद केले. जलदगती गोलंदाजांच्या प्रभावानंतर फिरकी गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला धक्के दिले. ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ अवघ्या 62 धावांवर माघारी परतला होता.