IND vs AUS 2nd T20I Live : यशस्वी जैस्वाल, इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांच्या वैयक्तिक अर्धशतकांच्या जोरावर भारताने दुसऱ्या ट्वेंटी-२०त मोठे आव्हान उभे केले. भारताच्या युवा ब्रिगेडने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा आजही पालापाचोळा केला. रिंकू सिंगने पुन्हा एकदा फिनिशरची भूमिका चोख बजावली आणि टीम इंडियाला दोनशेपार पोहोचवले.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड व यशस्वी जैस्वाल या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. सीन अबॉटने टाकलेल्या चौथ्या षटकात यशस्वीने ४,४,४,६,६ अशा २४ धावा चोपल्या. यशस्वीने आज स्टेडियम दणाणून सोडताना २४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. नॅथन एलिसने हे वादळ रोखले. यशस्वी २५ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ५३ धावांवर झेलबाद झाला. यशस्वी व ऋतुराज यांनी ५.५ षटकांत ७७ धावांची भागीदारी केली. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजाचा विक्रम यशस्वीने नावावर केला.
यशस्वी बाद झाल्यानंतर इशान किशन व ऋतुराज यांनी धावांचा वेग कायम राखला अन् भारताला शतकीपार पोहोचवले. इशानने उत्तम फटकेबाजी करून ३२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ५२ धावा चोपल्या आणि ऋतुराजसह ५८ चेंडूंत ८७ धावा जोडल्या. मार्कस स्टॉयनिसने इशानला बाद केले. ऋतुराजनेही ४० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. सूर्यकुमार यादव १० चेंडूंत १९ धावा करून माघारी परतला. ऋतुराज २०व्या षटकात बाद झाला. त्याने ४३ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ५८ धावा केल्या. रिंकूने ९ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांची नाबाद ३१ धावांची खेळी केली आणि टीम इंडियाने २० षटकांत ४ बाद २३५ धावा उभ्या केल्या.