India vs Australia 2nd T20I : ऑस्ट्रेलियाने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात भारतीय संघावर विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे आणि हा टीम इंडियासाठी आव्हान कायम राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. भारतीय संघ नागपूरमध्ये विजय मिळवून मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवेल, असा विश्वास चाहत्यांना आहे. १०० रुपये ते १ लाख रुपयांपर्यंत या सामन्याचे तिकीट विकले जात आहे. पण, २३ सप्टेंबरला होणाऱ्या या सामन्याआधी चाहत्यांना दुखावणारी बातमी समोर आली आहे.
मोहाली येथे झालेल्या पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्या, लोकेश राहुल व सूर्यकुमार यादव यांनी फलंदाजीत कमाल दाखवताना भारताला २०८ धावांचा टप्पा गाठून दिला. पण, गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे आणि लोकेश व अक्षर पटेल यांनी झेल सोडल्यामुळे भारताच्या हातून हा सामना निसटला. ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरून ग्रीन ( ६१), स्टीव्ह स्मिथ ( ३५) व मॅथ्यू वेड ( ४५*) यांनी उल्लेखनीय योगदान दिले. अक्षर पटेल ( ३-१७) वगळल्यास अन्य गोलंदाज अपयशी ठरले. भारतीय संघ दुसऱ्या सामन्यासाठी बुधवारी नागपूरमध्ये दाखल झाला आणि उद्या सराव करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. नागपूर विमानतळावर भारतीय खेळाडूंचे जंगी स्वागत केले गेले.
रोहित शर्माने सांगितलं कुठे चुकलो...सामन्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली नाही. २०८ धावांचा यशस्वी बचाव करता आल्या असत्या आणि त्याचवेळी क्षेत्ररक्षणातील चूकाही महागात पडल्या. फलंदाजांनी त्यांची कामगिरी चोख बजावली. आम्ही नेमकं कुठे चुकलो, हे या सामन्यात आम्हाला कळले आणि पुढील सामन्यात कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न करू.''