IND vs AUS 2nd T20I Predicted Playing XI: भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत चाहत्यांची निराशा केली. त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरूद्ध घरच्या मैदानावर भारत (Team India) कमबॅक करेल अशी अपेक्षा होती. पण तसे घडले नाही. आशिया चषकाप्रमाणेच मोक्याच्या क्षणी घडलेल्या चुकांमुळे टीम इंडियाला पहिल्या टी२० सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. हार्दिक पांड्याच्या ७१ धावा आणि उपकर्णधार लोकेश राहुलचे अर्धशतक याच्या जोरावर भारताने २० षटकात २००पार मजल मारली होती. पण गोलंदाजांची हाराकिरी आणि ढिसाळ फिल्डिंग यामुळे भारताला अखेर पराभवाला सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलियन (Australia) फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेतला आणि सामना जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या या दणक्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) दुसऱ्या टी२० सामन्यासाठी संघात मोठा बदल करणार असून एका खेळाडूचा संघातून पत्ता कट होणं जवळपास निश्चित आहे.
भारताने पहिल्या टी२० मध्ये सुरूवात अतिशय खराब केली होती. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे बडे फलंदाज स्वस्तात माघारी परतले होते. त्यानंतर लोकेश राहुलचे अर्धशतक, सूर्यकुमारच्या ४५ धावा आणि हार्दिक पांड्याची नाबाद ७१ धावांची तडाखेबाज खेळी याच्या जोरावर भारताने २०७ धावांपर्यंत मजल मारली होती. पण भारताच्या वेगवान गोलंदाजांनी साऱ्या मेहनतीवर पाणी फेरले. उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल या तिघांनीही अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. उमेश यादवने २ षटकांत २७ धावा दिल्या. हर्षल पटेलने ४ षटकांत ४९ धावा दिल्या तर भुवनेश्वर कुमारने ४ षटकांत ५२ धावा दिल्या. त्यामुळे भारताला मोठा फटका बसला. अशा परिस्थितीत भारतीय संघात आज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) संघात स्थान दिले जाण्याची दाट शक्यता असून त्याच्या जागी उमेश यादवला (Umesh Yadav) संघाबाहेर बसवले जाऊ शकते. रोहित शर्माच्या नेतृत्वशैलीकडे पाहता, रोहित असा बदल आजच्या सामन्यासाठी नक्कीच करू शकेल असा अंदाज वर्तवला जात आहे.
दरम्यान, भारतीय संघात टी२० वर्ल्ड कपसाठी मोहम्मद शमीचा विचार स्टँड बाय खेळाडूंमध्ये करण्यात आला आहे. शमी हा अनुभवी गोलंदाज असून त्याने IPL मध्ये चांगली कामगिरी केली होती. पण त्या निवड समितीने पसंती दर्शवली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर, भुवनेश्वर कुमारच्या जागी मोहम्मद शमीला संघात स्थान देण्यात यावे अशी मागणी नेटकरी करत आहेत. जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग या दोघांसोबत जर मोहम्मद शमी संघात असेल तर तीन वेगवान गोलंदाजांसह भारतीय बॉलिंग खूप शिस्तबद्ध होऊ शकेल असेही नेटकरी व क्रिकेट जाणकारांचे म्हणणे आहे.
भारताचा आजच्या सामन्यासाठी असा असू शकतो संघ- रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल