Australian batting flop, IND vs AUS 2nd test: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू व्हायला काही अवधी असताना भारताच्या टर्निंग पिचबद्दल गदारोळ झाला. भारताने सराव सत्रासाठी योग्य खेळपट्टी न दिल्याचा आरोप ऑस्ट्रेलियाने भारतीय फिरकीपटूंसाठी विशेष तयारी करत असल्याचा आरोप केला. पण कांगारू संघाचा प्रत्येक डाव फ्लॉप झाला आणि भारताने सलग दोन कसोटी सामने जिंकले. दिल्ली कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २६३ धावा केल्या होत्या आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दुसरा डाव खेळत असताना नागपूरच्या चुकांमधून पाहुण्या संघाने धडा घेतल्याचे दिसत होते. पण दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्यामुळे त्यांच्या फलंदाजांची दमछाक झाली.
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाकडे पाहता, येथे त्यांनी भारतीय फिरकीपटूंचा सामना करण्यासाठी एक हत्यार किंवा अस्त्र तयार केले होते, परंतु ते त्यांच्यावरच उलटले. टीम इंडियाच्या फिरकी जोडीचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी स्वीप आणि रिव्हर्स स्वीप खेळण्याची योजना आखली. पण दोन्ही प्रकारच्या फटकेबाजीत ते फेल ठरले. ऑस्ट्रेलियाचे बहुतांश फलंदाज क्लीन बोल्ड होऊन किंवा LBW होऊन आऊट झाले. ऑस्ट्रेलियाच्या या रणनीतीवर ऑस्ट्रेलियाची मीडिया, क्रिकेट तज्ज्ञ आणि भारतीय क्रिकेट जाणकारांनीही टीका केली आणि ही त्यांची चूक झाल्याचे स्पष्टपणे सांगितले.
ऑस्ट्रेलियन संघाच्या विकेट कशा पडल्या?
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन संघाने कसा स्वीप खेळला, याचा अंदाज यावरून लावता येतो की, दुसऱ्या डावात कांगारू संघाचे पाच खेळाडू क्लीन बोल्ड झाले, दोन खेळाडू LBW आऊट झाले, तर उर्वरित 3 पैकी एक खेळाडू यष्टिचित आणि २ झेलबाद झाले. उस्मान ख्वाजा, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू रेनशॉ, पॅट कमिन्स यांच्यासह अर्ध्याहून अधिक कांगारू फलंदाज स्वीप किंवा रिव्हर्स स्वीप खेळताना बाद झाले. फिरकीचा मुकाबला करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने हे हत्यार बनवले, पण इथे दिल्लीच्या खेळपट्टीवर त्या हत्याराने त्यांचा घात केला. खेळपट्टीत फारशी उसळी नसल्याने चेंडू अशा शॉटसाठी योग्यपणे बॅटवर येत नव्हता आणि त्यावेळीच फलंदाज चुकले.