पर्थ, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : यजमान ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटीत मोठ्या आघाडीच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. उस्मान ख्वाजा आणि कर्णधार टीम पेन यांनी पाचव्या विकेटसाठी सावध खेळ करताना संघाच्या धावांचा वेग कायम राखला आहे. त्यामुळे भारताचा कर्णधार विराट कोहली किंचितसा चिंतीत आहे आणि त्यात भर पडणारी बातमी सोमवारी सकाळी येऊन धडकली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 326 धावांचा पाठलाग करताना भारताचा पहिला डाव 283 धावांवर गडगडला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली, परंतु सलामीवीर अॅरोन फिंचला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. त्याची दुखापत ही संघासाठी मोठा धोक्याची बाब होती. बोटाला दुखापत झाल्याने तो उपहारानंतर मैदानावर परतलाच नाही. त्याच्या जागी ख्वाजा फलंदाजीला आला. मोहम्मद शमीच्या 13 व्या षटकात फिंचच्या बोटाला दुखापत झाली. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 33 धावा झाल्या होत्या आणि यजमानांकडे 76 धावांची आघाडी होती. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 326 धावांच्या उत्तरात भारताचा पहिला डाव 283 धावांवर गडगडला. बोटावर चेंडू आदळल्यानंतर फिंचने त्वरीत ग्लोज काढून डॉक्टरांना बोलावले. चौथ्या दिवशी फिंच मैदानावर उतरेल की नाही याची उत्सुकता होती. फिंचनेही कांगारूंच्या चाहत्यांना मोठा दिलासा दिला. त्याने सामना सुरु होण्यापूर्वी नेटमध्ये कसून सराव केला आणि तंदुरुस्त असल्याचे सिद्ध केले. फिंचच्या फिट होण्याने भारताची डोकेदुखी नक्की वाढणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही तो मैदानावर उतरणार असल्याचे स्पष्ट केले.