पर्थ, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाच्या उपाहारानंतर भारतीय संघाने वर्चस्व गाजवले. 4 बाद 192 धावा अशा मजबूत स्थितीत असलेल्या ऑस्ट्रेलियाचा डाव 243 धावांवर गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. चार सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशा आघाडीवर असलेल्या भारताला दुसऱ्या सामन्यात विजयासाठी 287 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करावा लागणार आहे. मोहम्मद शमीने 56 धावांत 6 विकेट घेत भारताला विजयाचे स्वप्न दाखवले, परंतु मागील पाच वर्षांचा इतिहास हा भारताच्या विरोधात असल्याचे आकडेवारी सांगत आहे.
2018 मध्ये भारताला अशा परिस्थितीचा तीनवेळा सामना करावा लागला आहे. यापैकी दोन सामने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे, तर एक सामना इंग्लंडविरुद्धचा आहे आणि यात भारताचा पराभव झाला आहे. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीत भारताला 207 आणि 286 धावांचे लक्ष्य गाठता आले नव्हते. इंग्लंडमध्ये 463 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लोकेश राहुल व रिषभ पंत यांच्या शतकी खेळीनंतरही भारताला 31 धावांनी पराभव पत्करावा लागला होता.
ऑस्ट्रेलियात मागील 10 वर्षांत दक्षिण आफ्रिकेलाच दोन वेळा चौथ्या डावात धावांचा यशस्वी पाठलाग करता आला आहे. त्यांनी डिसेंबर 2008 मध्ये पर्थ (4/414) आणि एमसीजी ( 1/183) येथे झालेल्या कसोटीत विजय मिळवले होते.