India vs Australia, 2nd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारपासून दिल्लीत खेळवला जाणार आहे. नागपूर कसोटीपूर्वी खेळपट्टीबाबत बराच गदारोळ झाला होता आणि आता पुन्हा एकदा दिल्ली कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन मीडिया खेळपट्टीबाबत गोंधळ घालत आहे. भारत दिल्ली कसोटीसाठी वापरात येणार असलेली खेळपट्टी लपवत असल्याचा आरोप अनेक ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या 'द एज'चा दावा आहे की दिल्लीच्या कोटला मैदानावरील क्युरेटर्सनी काही ऑस्ट्रेलियन पत्रकारांना छायाचित्रे घेण्यापासून रोखले.
नागपूर कसोटीनंतर खेळपट्टी हा या मालिकेतील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा बनला असताना हा प्रकार घडला. अन्य काही माध्यमांनीही असाच दावा केला आहे. नागपूर कसोटीपूर्वी जेव्हा खेळपट्टीचे चित्र समोर आले तेव्हा त्यावेळी बराच गदारोळ झाला होता. ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूंनी त्या खेळपट्टीशी छेडछाड झाल्याचाही आरोप केला होता. त्यामुळेच खेळपट्टीचा वाद अधिक वाढल्याचे दिसले. आता दिल्लीच्या खेळपट्टीवरही सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
दिल्लीची खेळपट्टी देखील फिरकी गोलंदाजीला पोषक असू शकते, असा अंदाज आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघासमोर संकट उभे राहिले आहे. मात्र, ऑस्ट्रेलियन मीडियाच्या आरोपांचा विचार केला तर दिल्लीच्या खेळपट्टीची काही छायाचित्रे सर्वांसमोर आली आहेत. यासोबतच ऑस्ट्रेलियन खेळाडू खेळपट्टी तपासून बघत असल्याचे फोटो समोर आले आहेत. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियन मीडीयाने खेळपट्टीबाबत केलेले आरोप चुकीचे असल्याचे दिसून येत आहे.
नागपुरातील टर्निंग पिचमुळे कांगारू संघाची अवस्था बिकट झाली होती. नागपुरात भारताने एक डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात १७७ धावा केल्या होत्या. तर दुसरा डाव ९१ धावांवर आटोपला होता. भारताच्या रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीपुढे कांगारू पूर्णपणे शरणागत झाले होते.