पर्थ, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताच्या पाच फलंदाजांना पाचव्या दिवशी केवळ 15 षटकं खिंड लढवता आली. ऑस्ट्रेलियाच्या 287 धावांचा पाठलाग करताना भारताचा निम्मा संघ चौथ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात माघारी परतला होता, अखेरच्या दिवशी उर्वरित पाच फलंदाजही माघारी फिरले. ऑस्ट्रेलियाने भारताचा डाव 140 धावांत संपुष्टात आणताना 146 धावांनी विजय मिळवला. या पराभवानंतर भारतीय संघातील वाद चव्हाट्यावर आणणारा व्हिडीओ समोर आला आहे. इशांत शर्मा आणि रवींद्र जडेजा यांच्यात ड्रिंक्स ब्रेकमध्ये कडाक्याचे भांडण झाल्याचे त्या व्हिडीओत दिसत आहे. बदली खेळाडू म्हणून जडेजा मैदानावर आला होता.
पर्थवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांतील खेळाडू एकमेकांची स्लेजिंग करताना दिसले. परंतु, भारतीय संघातील खेळाडू आपासातच वाद घालत असल्याच्या व्हिडीओने क्रिकेट चाहते नाराज झाले आहेत. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेल्या 287 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे 5 फलंदाज 112 धावांवर माघारी परतले होते. पाचव्या दिवशी विजयासाठी भारताला 175 धावा, तर ऑस्ट्रेलियाला 5 विकेट हव्या होत्या. मात्र, 287 धावांचा पाठलाग करताना पहिल्याच षटकात मिचेल स्टार्कने सलामीवीर लोकेश राहुलला (0) बाद केले. त्यापाठोपाठ चेतेश्वर पुजाराही ( 4) जोश हेझलवुडच्या गोलंदाजीवर माघारी परतला. कर्णधार विराट कोहली आणि मुरली विजय यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु नॅथन लियॉनने ऑस्ट्रेलियाला मोठे यश मिळवून दिले. त्याने कोहलीला बाद करताना भारताला मोठा धक्का दिला.
उपकर्णधार अजिंक्य रहाणे व हनुमा विहारी यांनी सावध खेळ करताना भारताची खिंड लढवली. दोघांनी भारताच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या, परंतु हेझलवुडने ही भागीदारी संपुष्टात आणली. रहाणेला बाद करताना हेझलवुडने भारताला पराभवाच्या सावटाखाली आणले. भारताने उर्वरित पाच फलंदाज पाचव्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात माघारी परतले. ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकून मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. पाहा व्हिडीओ..