सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. भारतीय संघाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पहिला सामना जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात भारतीय फिरकीपटूंचा दबदबा पाहायला मिळाला होता. दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कॅमेरून ग्रीन व मिचेल स्टार्क आजच्या सामन्यातही खेळणार नाहीत. मॅट शेनशोच्या जागी आज ट्रेव्हिस हेडला संधी मिळाली आहे, तर बोलंडच्या जागी कुलनेमन पदार्पण करत आहे. भारताकडून सूर्यकुमार यादवच्या जागी श्रेयस अय्यरला संधी देण्यात आली आहे.
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने साजेशी सुरूवात केली. 61.5 षटकांपर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 6 बाद 208 एवढी झाली. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर (15), उस्मान ख्वाजा (81), मार्नस लाबूशेन (18), स्टीव्ह स्मिथ (0), ट्रेव्हिस हेड (12) तर पीटर हँड्सकॉम्ब 88 चेंडूत 36 धावा करत कर्णधार पॅट कमिन्ससोबत खेळपट्टीवर टिकून आहे. ख्वाजा रिव्हर्स स्वीप मारून भारतीय फिरकीपटूंना हैराण करताना दिसला. याचदरम्यान अश्विन ख्वाजाला गोलंदाजी करत असताना विराट कोहलीने अश्विनला एक आइडिया दिली. विराट कोहलीने ही आयडिया हिंदीतून दिल्यानं ती ख्वाजालाही समजली. त्यावर ख्वाजासह कोहलीलाही हसू आले.
आर अश्विनने एकाच षटकात ऑस्ट्रेलियाला दोन मोठे धक्के दिले. मार्नस लाबुशेनला ( 18) पायचीत पकडल्यानंतर स्टीव स्मिथला ( 0) अश्विनने बाद केले. केएस भरतने अप्रतिम झेल घेतला. पहिल्या दिवसाचा लंच ब्रेक झाला तेव्हा ऑसींचे 3 फलंदाज 94 धावांवर माघारी परतले होते.
रवींद्र जडेजाचे 250 बळी पूर्ण
भारतीय संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने कसोटीमध्ये 250 बळी घेण्याचा विक्रम पूर्ण केला आहे. त्याने उस्मान ख्वाजाला 81 धावांवर तंबूत पाठवले आणि ही किमया साधली. भारतीय सलामीवीर लोकेश राहुलने घेतलेल्या अप्रतिम झेलमुळे ख्वाजाला आपल्या शतकाला मुकावे लागले. भारताकडून आर अश्विनने सर्वाधिक 3 बळी घेतले, तर मोहम्मद शमी (2) आणि रवींद्र जडेजाला (1) बळी घेण्यात यश आले. लक्षणीय बाब म्हणजे रविचंद्रन अश्विनने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या इतिहासात 100 बळी पूर्ण केले. अशी किमया साधणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"