Sunil Gavaskar Team India, IND vs AUS 2nd Test : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील पहिली कसोटी अनपेक्षित कमबॅक करून जिंकल्यानंतर दुसऱ्या कसोटी भारतीय संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले. दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा पहिला डाव १८० धावांत आटोपला. नंतर ट्रेव्हिस हेडच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३३७ धावा केल्या. दुसऱ्या डावातही भारतीय फलंदाजांनी वाईट कामगिरी केली. भारताचा डाव अवघ्या १७५ धावांवर संपुष्टात आला आणि ऑस्ट्रेलियाला केवळ १९ धावांचे आव्हान मिळाले. ते आव्हान सहज पूर्ण करत यजमान कांगारुंनी दहा गडी राखून विजय मिळवला. भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी भारतीय खेळाडूंची चांगलीच कानउघाडणी केली. सामना संपला म्हणून रुममध्ये पडून राहू नका, त्यापेक्षा या दोन दिवसाचा सदुपयोग करा, असा सल्ला गावसकरांनी दिला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी कसोटी तिसऱ्या दिवशी संपली. भारतीय फलंदाजांनी चाहत्यांना प्रचंड निराश केले. बड्या खेळाडूंना आपला ठसा उमटवता आला नाही. या साऱ्या प्रकारानंतर सुनील गावसकर यांनी भारतीय खेळाडूंना खडेबोल सुनावले. ते म्हणाले, "जर कसोटी सामना पूर्ण वेळ सुरु राहिला असता तर तुम्हाला पाच दिवस मैदानात उतरून क्रिकेट खेळावे लागले असते. त्यामुळे आता पाच सामन्यांची सिरिज आहे हे विसरून जा. असा विचार करा की आता जे तीन सामने शिल्लक आहेत, त्या तीन सामन्यांचीच सिरिज आहे आणि त्या दृष्टीने तयारीला लागा. या सामन्यातील उरलेले दोन दिवस सत्कारणी लावा. मिळालेल्या वेळेचा सरावासाठी सदुपयोग करा. सामना संपला म्हणून हॉटेलच्या रूमवर पडून राहू नका. तुम्ही क्रिकेट खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला आहात."
"तुमचा कसोटी सामना तीन दिवसात संपला आहे. आता पुढल्या दोन दिवसात तुम्ही क्रिकेटचा सराव करा. पूर्ण दिवस क्रिकेट खेळायची गरज नाही पण किमान एखाद्या सत्राचा सराव करा. कारण तुम्हाला पुढच्या सामन्याची तयारी करायला चांगला वेळ मिळाल आहे. सामना संपला म्हणून हॉटेलच्या रूममध्ये आराम करत बसू नका. त्यापेक्षा त्या दोन दिवसांत सराव करा आणि उर्वरित मालिकेत आणखी चांगली कामगिरी कशी करता येईल या दृष्टीने तयारी करा. पाच दिवसांची कसोटी सुरु आहे असं समजा आणि त्या दोन दिवसात नियमित मैदानावर जाऊन सराव करा," अशा शब्दांत गावसकरांनी भारतीय संघाला सल्ला दिला.
दरम्यान, आता भारत-ऑस्ट्रेलिया यांच्या कसोटी मालिकेतील तीन सामने शिल्लक आहेत. ते सर्व सामने जिंकल्यास भारतीय संघाला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत (WTC FINAL 2025) पोहोचणे जास्त सोपे जाईल.