पर्थ, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पर्थ कसोटीच्या तिसऱ्या दिवशी शतक पूर्ण केले. 2018 मधील त्याचे हे पाचवे कसोटी आणि सर्व प्रकारच्या फॉरमॅटमधील 11वे शतक ठरले. 3 बाद 172 धावांवरून तिसऱ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाला पहिल्याच षटकात झटका बसला. ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लियॉनने पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अजिंक्य रहाणेला बाद केले. त्यानंतर कोहलीने जबाबदारीने खेळ करताना भारताच्या धावांचा वेग कायम राखला. त्याने 214 चेंडूंत शतक पूर्ण केले आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या विक्रमाला मागे टाकले.
यासह 1992नंतर पर्थवर कसोटी शतक झळकावणारा कोहली पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. 1992 मध्ये तेंडुलकरने अशी कामगिरी केली होती. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक शतक करण्याच्या विक्रमात कोहली चौथ्या स्थानावर आहे. या क्रमवारीत तेंडुलकर 20 शतकांसह आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ जॅक हॉब्स, ब्रायन लारा आणि कोहली ( प्रत्येकी 12 शतकं) यांचा क्रमांक येतो. सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून कोहलीचे हे 2018 मधील 11 वे शतक ठरले. त्याने 2017 मध्येही 11 शतकं झळकावली होती. त्याला तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची संधी आहे. तेंडुलकरने 1998 मध्ये 12 शतकांचा विक्रम केला होता आणि तो अजूनही अबाधित आहे.