पर्थ, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाला दुसऱ्या कसोटीत पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेल्या 287 धावांचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ 140 धावांवर माघारी परतला. पाचव्या दिवशी अवघ्या 15 षटकांत भारताचे उर्वरित पाच फलंदाज माघारी परतले. ऑस्ट्रेलियाने 146 धावांनी हा सामना जिंकून चार सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी मिळवली. फिरकीपटू नॅथन लियॉनने दोन्ही डावांत मिळून 8 विकेट घेत विजया सिंहाचा वाटा उचलला. या पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीच्या नावावर मात्र नकोसा विक्रम नोंदवला गेला. हाच विक्रम पुढेही वाढत राहिल्यास तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही मागे टाकू शकतो.
पर्थ कसोटीच्या पहिल्या डावात कोहलीने 123 धावा करूनही भारत पराभूत झाला आणि कोहलीच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. कर्णधार म्हणून शतक झळकावूनही संघाला सर्वाधिक पराभव पत्करावा लागल्याचा विक्रम कोहलीच्या नावावर नोंदवला गेला आहे. कर्णधार कोहलीने शतक झळकावल्यानंतरही भारत सहा कसोटी सामन्यात पराभूत झाला आहे. या विक्रमात ब्रायन लारा ( 5) आणि स्टीव्ह वॉ ( 4) अनुक्रम दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत. हीच मालिका कायम राहिल्यात कोहली तेंडुलकरलाही मागे टाकू शकतो. तेंडुलकरची अकरा शतकं ही भारताला विजय मिळवून देऊ शकलेली नाही. भारतीयांमध्ये हा विक्रम तेंडुलकरच्याच नावावर आहे आणि त्यापाठोपाठ कोहली (7) आणि मोहम्मद अझरुद्दीन ( 7) यांचा क्रमांक येतो.