Rohit Sharma Ravi Shastri, IND vs AUS 2nd Test: टीम इंडियाने ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेची विजयी सुरुवात केली. नियमित कर्णधार रोहित शर्मा वैयक्तिक कारणास्तव उपलब्ध नसल्याने, जसप्रीत बुमराहने भारताचे नेतृत्व केले. कर्णधारपदाला साजेशी कामगिरी करत त्याने पहिल्या कसोटीत ८ बळी टिपले आणि सामनावीराचा किताब जिंकला. तसेच रोहितच्या जागी सलामीला आलेल्या यशस्वी जैस्वाल - केएल राहुल जोडीने द्विशतकी भागीदारी करत टीम इंडियाच्या विजयात मोठा वाटा उचलला. आता दुसरी कसोटी ६ डिसेंबरपासून खेळली अँडलेडच्या ओव्हल मैदानावर खेळवली जाणार आहे. रोहित शर्मा पालकत्व रजा संपवून संघात सामील झाला आहे. अशा परिस्थितीत रोहितने कुठल्या क्रमांकावर फलंदाजी करावी, असा पेच आहे. याबाबत भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भारताने गेल्या सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे फलंदाजीतील क्रमाचे विजयी कॉम्बिनेशन बदलायचे की नाही, याची चर्चा सुरु आहे. तशातच रवी शास्त्री यांनी आपले मत मांडले. "भारतीय संघाच्या विजयी सलामीनंतर रोहित शर्मा संघात येणं ही जमेची बाब आहे. रोहित शर्माच्या प्रतिभेबाबत कुणालाही संशय नाही. तो प्रचंड अनुभवी क्रिकेटपटू आहे. त्याच्यासारखा अनुभवी खेळाडू भारतीय फलंदाजी क्रमात मधल्या फळीत असल्यास संघाला फायदा होईल. भारतीय संघात सध्या अनुभवी आणि युवा खेळाडूंचे चांगले मिश्रण आहे. त्यामुळे रोहितने सलामीला फलंदाजी करायची की मधल्या फळीत खेळायचे यायचे हा सर्वस्वी त्याचा चॉईस असेल" असे रवी शास्त्री म्हणाले.
"रोहित शर्मा प्रचंड अनुभवी आहे. ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्यांवर त्याला सर्वाधिक चांगला खेळ कुठल्या क्रमांकावर करता येईल याची त्याला पूर्ण कल्पना आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना रोहित शर्मा कुठल्या क्रमांकावर सर्वाधिक त्रास देऊ शकेल याचा त्याने विचार केला पाहिजे आणि त्यानुसार फलंदाजीचा क्रमांक निवडला पाहिजे. रोहित स्वत:च संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे त्याचा निर्णय त्यालाच घ्यायचा आहे," असे सूचक विधान रवी शास्त्रींनी केले.