पर्थ, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : पर्थ कसोटीच्या पहिला दिवस चांगलाच रंगला. पहिल्या सत्रात भारताला एकही बळी मिळाला नसला तरी त्यानंतरच्या दोन्ही सत्रात भारताने प्रत्येकी तीन बळी मिळवले. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनीही चांगली कामगिरी केली, त्यामुळेच सामना दोलायमान अवस्थेत पाहायला मिळाला. पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने सहा बळी गमावत २७७ धावांपर्यंत मजल मारली आहे.
ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर मार्कस हॅरिस आणि आरोन फिंच यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या सत्रात या दोघांनी दमदार फलंदाजीचा नमुना पेश केला. या दोघांनी ११२ धावांची सलामी देत संघाला चांगली सुरुवात करून दिली हॅरिसने यावेळी १० चौकारांच्या मदतीने ७० धावांची खेळी साकारली. हॅरिसला ६० धावांवर असताना भारताच्य लोकेश राहुलने झेल सोडत जीवदान दिले होते. पण त्याचा जास्त फायदा हॅरिसला उचलता आला नाही. फिंचने यावेळी हॅरिसला चांगली साथ दिली. फिंचने ६ चौकारांच्या जोरावर ५० धावा केल्या.
सलामीची जोडी गारद झाल्यावर ऑस्ट्रेलियाने काही वेळातच दोन फलंदाज गमावले. त्यामुळे त्यांची बिनबाद ११२ पासून ४ बाद १४८ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर ट्रेविस हेड आणि शॉन मार्श यांनी पाचव्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी रचत संघाला दोनशे धावांचा टप्पा गाठून दिला.
ऑस्ट्रेलियाची हेड आणि मार्श ही जोडी तग धरत होती. त्यावेळी भारताच्या हनुमा विहारीने जोडी फोडली. विहारीने या डावात दुसऱ्यांदा भारताला घवघवीत यश मिळवून दिले. अर्धशतकवीर हॅरिसला बाद करत विहारीने भारताला मोठे यश मिळवून दिले होते. त्यानंतर मार्शला तंबूचा रस्ता दाखवत त्याने स्थिरस्थावर झालेली जोडी फोडली. हेडने ६ चौकारांच्या मदतीने ५८ धावा केल्या, तर मार्शने सहा चौकारांच्या जोरावर ४५ धावा फटकावल्या.
भारताकडून विहारी आणि इशांत शर्मा यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. जसप्रीत बुमरा आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.
Web Title: IND vs AUS 2st Test: First day Australia 277 for 6
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.