पर्थ, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : पर्थ येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मार्कस हॅरिसने भारताच्या गोलंदाजांना चांगलेच तंगवले होते. हॅरिसने या सामन्यात आपले पहिले अर्धशतक झळकावले. त्यानंतर हॅरिसला बाद करण्याची संधी भारताकडे आली होती. पण लोकेश राहुलने झेल सोडत हॅरिसला जीवदान दिले.
उमेश यादव भेदक मारा करत होता. यावेळी ४५ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर हॅरिसचा झेल उडाला होता. हा झेल टिपण्यासाठी राहुल सरसावला खरा, पण त्याला हा झेल टिपता आला नाही. त्यावेळी हॅरिस ६० धावांवर होता. राहुलने हॅरिसचा झेल सोडला आणि चौकारही दिला. पण या जीवदानाचा फायदा हॅरिसला उचलता आला नाही. हनुमा विहारीच्या एका उसळत्या चेंडूवर हॅरिसचा झेल उडाला आणि तो पहिल्या स्लीपमध्ये असलेल्या अजिंक्य रहाणेने अचूक टिपला. हॅरिसने १० चौकारांच्या मदतीने ७० धावा केल्या.