भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या वन डे मालिकेतील आज तिसरा सामना खेळला जात आहे. सध्या मालिका १-१ अशी बरोबरीत असल्याने आजचा सामना निर्णायक आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. पण ऑस्ट्रेलियाला सुरूवातीच्या षटकांत झटके बसले. भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या गोलंदाजीसाठी आला आणि त्याने सलामीवीर मिचेल मार्शचा उडवलेला त्रिफळा चांगलाच चर्चेत राहिला.
दुसऱ्या सामन्यात दारूण पराभव स्वीकारल्यानंतर टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात गोलंदाजीत कामगिरी उंचावल्याचे दिसले. मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांनी पहिल्या ७ षटकांत विकेट न घेतल्याने रोहितने चेंडू हार्दिककडे सोपवला आणि त्याने कमाल केली. सलामीवीर ट्रेव्हिस हेड (३३) आणि स्टीव्ह स्मिथ (०) यांना हार्दिकने स्वस्तात बाद केलं. पण दुसरा सलामीवीर मिचेल मार्श टीम इंडियाला नडत होता. आपल्या फलंदाजीच्या जोरावर तो अर्धशतकाच्या अगदी नजीक पोहोचलाच होता, पण हार्दिकने त्याची इच्छा पूर्ण होऊ दिली नाही. ४७ चेंडूत ४७ धावा करणाऱ्या मिचेल मार्शला हार्दिकने थेट क्लीन बोल्ड केले आणि सामन्यात रंगत आणली. पाहा व्हिडीओ-
दरम्यान, मिचेल मार्श च्या विकेटआधी ऑस्ट्रेलियाने चांगली सुरूवात केली होती. या दोघांनी १० षटकांत ६८ धावा केल्या होत्या. पण नंतर हार्दिक पांड्याने दोन षटकात दोन बळी घेतले. प्रथम त्याने ट्रेव्हिस हेडला माघारी धाडले आणि नंतर स्मिथला शून्यावर बाद केले.