IND vs AUS 3rd ODI | राजकोट : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतील अखेरचा सामना होत आहे. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून यजमान भारतीय संघाने मालिका खिशात घातली आहे. त्यामुळे आजचा सामना पाहुण्या ऑस्ट्रेलियासाठी अस्तित्वाची लढाई असेल. आजच्या सामन्यातून भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली हे पुनरागमन करत आहेत. आगामी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने या दोघांना पहिल्या दोन सामन्यांत विश्रांती दिली होती. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
दरम्यान, लोकेश राहुलच्या नेतृत्वात भारतीय संघाने पहिले दोन्ही सामने जिंकले. दुसऱ्या सामन्यातील शतकवीर शुबमन गिलला विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर या सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे. लक्षणीय बाब म्हणजे ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल स्टार्क यांची अखेरच्या सामन्यातून ऑस्ट्रेलियन संघात एन्ट्री झाली आहे. तसेच पाहुण्या संघाचा कर्णधार पॅट कमिन्सची देखील एन्ट्री झाली आहे.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
आजच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ - पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबूशेन, अॅलेक्स कॅरी, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरून ग्रीन, मिचेल स्टार्क, तन्वीर सांघा आणि जोश हेझलवुड.