India vs Australia 3rd ODI Live Update Marathi : ऑस्ट्रेलियाच्या ३५२ धावांच्या प्रत्युत्तरात रोहित शर्माने दमदार सुरुवात केली. त्याने विराट कोहलीसह जोडी जमवली. पण, ग्लेन मॅक्सवेलच्या फिरकीने आज कमाल करून दाखवली. वॉशिंग्टन सुंदर, रोहित शर्मा, विराट कोहली अन् श्रेयस अय्यर या विकेट्स घेत त्याने ऑस्ट्रेलियाला सामन्यावर मजबूत पकड मिळवून दिली. स्वतःच्याच गोलंदाजीवर मॅक्सवेलने रोहितला घेतलेला अविश्वसनीय झेल, सर्व पाहत बसले. मॅक्सवेलने १० षटकांत ४० धावांत ४ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. भारताने ही मालिका २-१ अशी जिंकली. वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्यापूर्वी भारताला पराभव स्वीकारावा लागला. आता भारतीय संघ ३० तारखेला वर्ल्ड कप सराव सामन्यात मैदानावर उतरेल.
ग्लेन मॅक्सवेलने अविश्वसनीय झेल घेतला, रोहित शर्मासह कुणालाच विश्वास नाही बसला, Video
रोहित शर्मासह आज ओपनिंगला वॉशिंग्ट सुंदर आला. ग्लेन मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाला पहिले यश मिळवून दिले. वॉशिंग्टन ( १८) चा लाबुशेनने सुरेख झेल टिपला आणि भारताला ७४ धावांवर पहिला धक्का बसला. हिटमॅन शतक झळकावेल असेच वाटले होते आणि विराट कोहलीची त्याला चांगली साथ मिळाली होती. या दोघांची ७० धावांची भागीदारी मॅक्सवेलनेच तोडली. रोहितने मारलेला सरळ चेंडू मॅक्सवेलने अविश्वसनीय पद्धतीने टिपला. रोहित ५७ चेंडूंत ५ चौकार व ६ षटकारांसह ८१ धावांवर बाद झाला. पुढच्या षटकात मॅक्सवेलने आणखी एक विकेट घेत विराटला ( ५६) माघारी जाण्यास भाग पाडले.
मागील सामन्यातील शतकवीर श्रेयर अय्यर आणि लोकेश राहुलने जबाबदारी खांद्यावर घेतली. पण, चेंडू व धावांचे अंतर वाढताना दिसले अन् त्याला कारण ऑस्ट्रेलियाचे अफलातून क्षेत्ररक्षण ठरले. ९० चेंडूंत १३२ धावा भारताला करायच्या होत्या अन् त्यांनी धावांसाठी संघर्ष करायला लावला होता. त्याल मिचेल स्टार्कने धक्का दिला अन् राहुल २६ धावांवर झेलबाद झाला. सूर्यकुमार यादव व श्रेयस ही मुंबईकर जोडी मैदानावर उभी राहिली. पण, जोश हेझलवूडने ८ धावांवर सूर्याला माघारी पाठवले. मॅक्सवेलच्या फिरकीने पुन्हा एकदा कमाल केली अन् त्याने श्रेयस अय्यरची ( ४८) दांडी उडवली. भारताच्या हातून सामना गेलाच होता आणि आता केवळ पूर्ण ५० षटकं खेळून काढण्याची औपचारिकता शिल्लक राहिलेली. रवींद्र जडेजा ३५ धावा करून माघारी परतला. भारताला संपूर्ण संघ ४९.४ षटकांत २८६ धावांवर ऑल आऊट झाला.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने ७ बाद ३५२ धावांचा डोंगर उभा केला. मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर ( ५६) यांनी पहिल्या विकेटसाठी ७८ धावा जोडल्या. मार्श आणि स्टीव्ह स्मिथ यांनी १३७ धावांची भागीदारी केली. मार्श ८४ चेंडूंत १३ चौकार व ३ षटकारांसह ९६ धावांवर बाद झाला, तर स्मिथने ६१ चेंडूंत ७४ धावा केल्या. अॅलेक्स केरी ( ११), ग्लेन मॅस्कवेल ( ५), कॅमेरून ग्रीन ( ९) यांना झटपट माघारी पाठवून भारतीय गोलंदाजांनी चांगले कमबॅक केले. मार्नस लाबुशेनने ५८ चेंडूंत उपयुक्त ७२ धावा केल्या. जसप्रीत बुमराहने ३ आणि कुलदीप यादवने २ विकेट्स घेतल्या.