India vs Australia 3rd ODI Live Update Marathi : ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेल्या ३५३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करून इतिहास घडवण्याची टीम इंडियाला संधी आहे. वन डे मालिकेत भारताने एकदाही कांगारूंना क्लीन स्वीप दिलेला नाही. त्यामुळेच एवढं मोठं लक्ष्य समोर असताना रोहित शर्मा व विराट कोहली ही जोडी सलामीला येईल अशी अपेक्षा होती. शुबमन गिलला विश्रांती दिली आणि इशान किशन आजारी पडला आहे. पण, रोहितसह अनपेक्षित जोडीदार ओपनिंगला आता आहे.
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करताना ७ बाद ३५२ धावांचा डोंगर उभा केला. रायपूर येथील खेळपट्टीवरील ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली. मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर पोषक खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचलला अन् पहिल्या विकेटसाठी ७८ धावा जोडल्या. वॉर्नरने ३४ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ५६ धावा केल्या. मार्श आणि स्टीव्ह स्मिथ यांनी ११८ चेंडूं त १३७ धावांची भागीदारी केली. मार्श ८४ चेंडूंत १३ चौकार व ३ षटकारांसह ९६ धावांवर बाद झाला, तर स्मिथने ६१ चेंडूंत ७४ धावा केल्या. अॅलेक्स केरी ( ११), ग्लेन मॅस्कवेल ( ५), कॅमेरून ग्रीन ( ९) यांना झटपट माघारी पाठवून भारतीय गोलंदाजांनी चांगले कमबॅक केले. मार्नस लाबुशेनने ५८ चेंडूंत उपयुक्त ७२ धावा केल्या. जसप्रीत बुमराहने ३ आणि कुलदीप यादवने २ विकेट्स घेतल्या.
शुबमन गिल व इशान किशन यांच्या अनुपस्थितीत रोहित शर्मासह आज ओपनिंगला वॉशिंग्ट सुंदर आला. या दोघांनी संघाला दमदार सुरूवात करून दिली. रोहितने पहिल्या सहा षटकांत ३ षटकार व ३ चौकार खेचले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतात सर्वाधिक २५९ षटकाराचा विक्रम रोहितने नावावर नोंदवला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५५३ षटकार ख्रिस गेलच्या नावावर आहेत आणि त्यानंतर रोहित ५५० षटकारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.