Join us  

IND vs AUS: सूर्यकुमार यादवचं करायचं काय... 'वॉर्निंग' देऊन पण पहिल्या बॉलवर झाला OUT

Suryakumar Yadav: गेल्या सामन्यातच रोहित शर्माने सूर्यकुमार यादवला ताकीद दिली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 9:21 PM

Open in App

Suryakumar Yadav Rohit Sharma, IND vs AUS 3rd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील निर्णायक सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने भारताला २७० धावांचे आव्हान दिले. मिचेल मार्शच्या ४७, अलेक्स कॅरीच्या ३८ आणि इतर खेळाडूंच्या छोटेखानी खेळीच्या साथीने ऑस्ट्रेलियाने सर्वबाद २६९ धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करताना, सूर्यकुमार यादव मात्र शून्यावर बाद झाला. रोहित शर्माने गेल्या सामन्यातच त्याला ताकीद दिली असूनही ते आज अपयशी ठरला.

२७० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांच्यात चांगली भागीदारी होत होती. पण रोहित शर्मा ३० धावांवर झेलबाद झाला. शुबमन गिल ३७ धावांवर LBW झाला. केएल राहुलला चांगली सुरूवात मिळाली होती. पण तो ५० चेंडूत ३२ धावांवर बाद झाला. अक्षर पटेलही २ धावांवर माघारी परतला. विराट कोहलीने झुंजार अर्धशतक ठोकले. त्याने ७२ चेंडूत २ चौकार आणि १ षटकार खेचत संयमी खेळी केली. त्याच्यानंतर सूर्यकुमार यादव खेळण्यासाठी आला, पण त्याने पुन्हा एकदा रोहितला आणि टीम इंडियाच्या चाहत्यांना निराश केलं. फिरकीपटू अस्टन अगारने शून्यावर त्याला माघारी पाठवलं.

त्याआधी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ट्रेव्हिस हेड आणि मिचेल मार्श जोडीने पाहुण्यांना चांगली सुरूवात मिळवून दिली होती. त्यांनी १० षटकांच्या आत ६८ धावापर्यंत केल्या. पण ट्रेव्हिस हेड (३३), मिचेल मार्श (४७) दोघांना हार्दिकने बाद केले. पाठोपाठ स्टीव्ह स्मिथलाही त्याने शून्यावर माघारी पाठवले. नंतर कुलदीप यादवने डेव्हिड वॉर्नर २३ तर आणि मार्नस लाबूशेन २८ धावांवर बाद झाला. अलेक्स कॅरीच्या ३८ आणि मार्कस स्टॉयनीसच्या २५ धावांमुळे ऑस्ट्रेलियाने द्विशतकी मजल मारली. अखेर अबोटच्या २६, अगारच्या १७, मिचेल स्टार्कच्या १० आणि अडम झम्पाच्या नाबाद १० धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने सर्वबाद २६९ धावा केल्या. भारताकडून हार्दिक, कुलदीपने ३-३ तर सिराज, अक्षरने २-२ बळी टिपले.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियासूर्यकुमार अशोक यादवरोहित शर्माविराट कोहली
Open in App