ND vs AUS Rohit Sharma Kuldeep Yadav, Video: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील निर्णायक सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने भारताला २७० धावांचे आव्हान दिले. मिचेल मार्शच्या ४७, अलेक्स कॅरीच्या ३८ आणि इतर खेळाडूंच्या छोटेखानी खेळीच्या साथीने ऑस्ट्रेलियाने सर्वबाद २६९ धावा केल्या. सुरूवातीच्या षटकांत ऑस्ट्रेलियाने झटपट विकेट गमावल्याने त्यांना द्विशतकी मजलही मारता येणार नाही असे वाटत होते. पण त्यांच्या प्रत्येक खेळाडूने छोट्या पण उपयुक्त खेळी करत संघाला अडीचशेपार मजल मारून दिली. भारताकडून हार्दिक, कुलदीपने ३-३ तर सिराज, अक्षरने २-२ बळी टिपले. या सामन्यात रोहित शर्माविराट कोहलीसमोरचकुलदीप यादववर संतापल्याचे दिसून आले.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ट्रेव्हिस हेड आणि मिचेल मार्श जोडीने पाहुण्यांना चांगली सुरूवात मिळवून दिली होती. त्यांनी १० षटकांच्या आत ६८ धावापर्यंत मजल मारली. पण हार्दिक पांड्याने त्यांचा शतकी सलामीचा डाव उधळला. हार्दिकने आधीच्या षटकात ट्रेव्हिस हेडला ३३ धावांवर आणि नंतर स्टीव्ह स्मिथला शून्यावर माघारी पाठवले. मिचेल मार्श झुंज देत होता पण त्याला हार्दिकने ४७ धावांवर त्रिफळाचीत केला. हार्दिकच्या नंतर कुलदीप यादवने फिरकीची जादू दाखवली. त्याने डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लाबूशेन जोडीची भागीदारी फोडली. वॉर्नर २३ तर लाबूशेन २८ धावांवर माघारी परतला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची अवस्था ५ बाद १३८ झाली होती. पण खालच्या फळीतील फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना तंगवले.
अलेक्स कॅरीच्या ३८ आणि मार्कस स्टॉयनीसच्या २५ धावांमुळे ऑस्ट्रेलियाने द्विशतकी मजल मारली. त्यानंतर हे दोघे बाद झाल्यावर सीन अबोट आणि अस्टन अगार मैदानात होते. त्यावेळी एक घटना घडली. अगार पायचीत असल्याचे कुलदीप यादवला वाटत होते. पण अंपायरने त्याला बाद ठरवले नाही. कुलदीपने रोहित शर्माकडे अक्षरश: DRS घेण्याचा हट्ट धरला आणि रोहितने अवघे १ सेकंद शिल्लक असताना त्याचा हट्ट पुरा केला. त्यानंतर रोहित शर्मा आधी हसला आणि मग तावातावाने कुलदीप यादववर चाल करून गेला. तो बोट रोखून त्याच्याशी काही तरी बोलला. नंतरदेखील DRS वाया गेल्यावर रोहित कुलदीपवर चांगलाच उखडलेला दिसला. पाहा व्हिडीओ-
--
हा सारा प्रकार झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाची अवस्था ७ बाद २०३ होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी चांगली झुंज दिली. अबोटच्या २६, अगारच्या १७, मिचेल स्टार्कच्या १० आणि अडम झम्पाच्या नाबाद १० धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने सर्वबाद २६९ धावा केल्या. भारताकडून हार्दिक, कुलदीपने ३-३ तर सिराज, अक्षरने २-२ बळी टिपले.