Australia beat India to Win ODI Series, IND vs AUS: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला २०१९ पासून सलग वन-डे सिरीजमध्ये हरवण्याची परंपरा स्टीव्ह स्मिथच्या ऑस्ट्रेलियाने अखेर कायम राखली. पहिला सामना गमावल्यावर आणि दुसऱ्या सामना जिंकल्यावर, आजच्या निर्णायक सामन्यात ऑस्ट्रलियाने भारताचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना मिचेल मार्शच्या ४७, अलेक्स कॅरीच्या ३८ आणि इतर खेळाडूंच्या छोटेखानी खेळीच्या साथीने ऑस्ट्रेलियाने सर्वबाद २६९ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव २४८ वर आटोपला आणि त्यांनी २१ धावांनी पराभूत व्हावे लागले. या विजयासोबतच कांगारूंनी वन-डे मालिका २-१ ने खिशात घातली.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ट्रेव्हिस हेड आणि मिचेल मार्श जोडीने पाहुण्यांना चांगली सुरूवात मिळवून दिली होती. त्यांनी १० षटकांच्या आत ६८ धावापर्यंत केल्या. पण ट्रेव्हिस हेड (३३), मिचेल मार्श (४७) दोघांना हार्दिकने बाद केले. पाठोपाठ स्टीव्ह स्मिथलाही त्याने शून्यावर माघारी पाठवले. नंतर कुलदीप यादवने डेव्हिड वॉर्नर २३ तर आणि मार्नस लाबूशेन २८ धावांवर बाद झाला. अलेक्स कॅरीच्या ३८ आणि मार्कस स्टॉयनीसच्या २५ धावांमुळे ऑस्ट्रेलियाने द्विशतकी मजल मारली. अखेर अबोटच्या २६, अगारच्या १७, मिचेल स्टार्कच्या १० आणि अडम झम्पाच्या नाबाद १० धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने सर्वबाद २६९ धावा केल्या. भारताकडून हार्दिक, कुलदीपने ३-३ तर सिराज, अक्षरने २-२ बळी टिपले.
२७० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांच्यात चांगली भागीदारी होत होती. पण रोहित शर्मा ३० धावांवर झेलबाद झाला. शुबमन गिल ३७ धावांवर LBW झाला तर केएल राहुल ३२ धावांवर बाद झाला. अक्षर पटेल २ धावांवर माघारी परतला. विराट कोहलीने झुंजार अर्धशतक ठोकत ७२ चेंडूत २ चौकार आणि १ षटकार खेचत ५४ धावांची संयमी खेळी केली. सूर्यकुमार यादव शून्यावर बाद झाला. हार्दिक पांड्याने झुंज देत ४० धावा केल्या. जाडेजानेही त्याला साथ देत १८ धावा केल्या. पण हे दोघेही मोठा फटका खेळताना बाद झाले. लगेच पुढे भारताच्या शेपटाला ऑस्ट्रेलियाने गुंडाळले आणि मालिका विजय मिळवला.